( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
जयगड पोलीस ठाण्यात दाखल वीर खूनप्रकरणातील आरोपी क्र. ३ दर्शन शांताराम पाटील (५७) यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अ. म. अंबळकर (अतिरिक्त सत्र न्यायाधीश, रत्नागिरी) यांनी २३ सप्टेंबर रोजी खुले न्यायालयात हा आदेश उच्चारित केला.
दर्शन पाटील यांचा मुलगा आरोपी दुर्वास पाटील हा तब्बल तीन खुनाच्या गुन्ह्यात सहभागी आहे. यातील मृत सीताराम वीर खुनाच्या ( गुन्हा क्र. ३७/२०२५ ) अंतर्गत कलम ३०२, २०१, १०९ सह ३४ भा.दं.सं.नुसार दाखल खटल्यात दर्शन पाटील विरोधात मुलाला खून करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. मात्र पोलिसांच्या अटकेनंतर दर्शन पाटील यांची प्रकृती अधिक बिघडल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला त्यांना रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वैद्यकीय अहवालांनुसार दर्शन पाटील हे मल्टिपल ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोमने ग्रस्त असून अती दक्षता विभागात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
न्यायालयात सरकारी वकिलांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता दर्शन पाटील यांना जामिन देण्यास तीव्र विरोध केला. आरोपी जामिनावर सुटल्यास मुलगा न्यायालयीन कोठडीत असल्याने विविध पद्धतीने मदत करू शकेल. तसेच साक्षीदारांना धोका पोहोचवेल अशी शक्यता देखील सरकारी वकिलाकडून वर्तवली गेली. यासोबतच, आरोपी वृद्ध असल्याने तो जेलमध्ये निवांत बसून जीवन जगू शकेल. अशा विविध अंगानी सरकारी वकिलांनी तगडा युक्तिवाद केल्याने आरोपी दुर्वास पाटीलच्या बापाला बेल की जेल? असेच काहीसे वातावरण निर्माण झाले होते. परंतु बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपी दीर्घकाळ उपचाराखाली असून त्यांची देखभाल करण्यास नातेवाईकांना अडचण येत असल्याने मानवतावादी दृष्टीकोनातून जामिनाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
न्यायालयाने दोन्ही बाजूंची मते ऐकून, कागदपत्रांचा अभ्यास करून अखेरीस संशयित आरोपी दर्शन पाटील हा गंभीर आजारी असल्याचे मान्य केले. त्यानुसार, वैयक्तिक ५० हजार रुपयांचा जामीन व तितक्याच रकमेची हमी सादर करून त्यांची सुटका करण्याचे आदेश देण्यात आले. न्यायालयाकडून जामिनाचा आदेश देताना महत्त्वपूर्ण अटी दिल्या आहेत. संशयित आरोपीने प्रकृती सुधारल्यानंतर तपास अधिकाऱ्याशी संपर्क साधून तपासात सहकार्य करणे, साक्षीदार व फिर्यादी यांच्याशी कोणताही संपर्क न साधणे व पुराव्यात छेडछाड न करणे बंधनकारक असेल. या आदेशाची प्रत उपचार घेत असलेल्या जे. जे. रुग्णालयाला देखील पाठविण्यात आली आहे. या गंभीर आजारपणाचा दाखला देत न्यायालयाने आरोपीला दिलासा दिल्याने रत्नागिरीत या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे.

