( मुंबई )
मुंबईमधील चारकोपमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.0 पोटच्या मुलानेच वडिलांची हत्या केली. मृत अयूब सैय्यद (वय 65), काचेचा व्यापारी, रविवार (21 सप्टेंबर) आपल्या ऑफिसमधील केबिनमध्ये यूट्यूब व्हिडीओ बघत होते.
त्याचवेळी दोन आरोपी धारदार शस्त्र घेऊन केबिनमध्ये शिरले. त्यांनी एकही शब्द न बोलता अयूब यांच्यावर तब्बल 30 वेळा चाकूने हल्ला केला. या निर्घृण हत्येनंतर आरोपी ठिकाणावरून घटनास्थळावरून निघून गेले, आणि परिसरात मोठी खळबळ उडाली.
पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, या हत्येमागे अयूब यांचा धाकटा मुलगा हनीफ सैय्यद होता. हनीफने सानू चौधरी आणि त्याच्या साथीदारांना हत्येसाठी पैसे देऊन गुन्हा घडवून आणला. चौधरीने गोवंडी येथील दोन तरुणांना 6.5 लाख रुपयांची सुपारी दिली.
पोलिसांनी सांगितलेली या कटाची कारणे:
- अयूब आपल्या मुलाला दुकानात काम करण्यास मनाई करायचा.
- दुकान विकण्याची धमकी देणे.
- वडील दुसऱ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करतात, परंतु पोटच्या मुलाकडे दुर्लक्ष करतात. खर्चासाठीही पैसे देत नव्हते.
- हनीफला भीती वाटत होती की, वडील जिवंत असताना त्याला आपला वाटा किंवा पैसे मिळणार नाहीत.
या नाराजी आणि लालसेमुळे हनीफने वडिलांच्या हत्येचा कट रचला. हत्येनंतर सुपारी घेतलेल्या आरोपींनी सानू चौधरीला मेसेज पाठवून काम पूर्ण झाल्याची माहिती दिली, त्यानंतर चौधरीने ऑनलाइन ऑटो बुक करून त्यांना पैसे यूपीआयद्वारे पाठवले.
मुंबई पोलीस झोन 11 चे डीसीपी संदीप जाधव आणि एसीपी विनायक चव्हाण यांनी घटनास्थळी तपास सुरू केला असता सीसीटीव्ही आणि मोबाईल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी सानू चौधरीला अटक केली. त्याने आपला गुन्हा कबूल केला. या प्रकरणी हनीफ सैय्यद, सानू चौधरी आणि मोहम्मद खैरुल इस्लाम या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

