(कणकवली)
कणकवली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत वागदे एसटी थांब्याजवळ एक्साईज विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली. बोलेरो पिकअपमधून गोवा बनावटीच्या दारूच्या 1,800 बाटल्या असलेल्या 150 बॉक्सची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. जप्त दारूची किंमत 7 लाख 20 हजार रुपये असून गाडीसह एकूण 16 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुजरातमधील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. कारवाईत निरीक्षक नितीन शिंदे, सहायक दुय्यम निरीक्षक रमाकांत ठाकूर, जवान अजित गावडे, तुषार ठेंबे आणि चालक हेमंत वस्त यांनी सहभाग घेतला.
पथक महामार्गावर वाहनांची तपासणी करत असताना बोलेरो पिकअपला थांबवण्यात आले. तपासणीत गाडीच्या हौद्यामध्ये 750 मिली क्षमतेच्या गोवा बनावटीच्या 1,800 दारू बाटल्या 150 कागदी बॉक्समध्ये लपवलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यानंतर दारूसह पिकअप जप्त करण्यात आली.
या प्रकरणी गुजरातमधील दिनेशभाई रतनभाई बावलीया आणि भावेशभाई हर्जीभाई वाडेर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील तपास एक्साईज निरीक्षक नितीन शिंदे करत आहेत.

