शिर्डीच्या साईबाबांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांची सेवा करणाऱ्या निष्ठावान भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेली चांदीची 9 नाणी सध्या नव्या वादात सापडली आहेत. या नाण्यांच्या मालकीवरून लक्ष्मीबाईंचे वंशज असल्याचा दावा करणाऱ्या दोन परिवारांमध्ये मोठा संघर्ष उभा राहिला असून, हा वाद आता न्यायप्रविष्ट होत आहे. ही नाणी श्रीसाईबाबांच्या भक्तीची, विश्वासाची आणि एक ऐतिहासिक, भावनिक ठेव मानली जातात. मात्र, आता याच नाण्यांवरून वाद निर्माण झाला आहे.
धर्मादाय आयुक्तांचा अहवाल: 9 नाणी ‘साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट’कडेच
अहिल्यानगर येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयाने केलेल्या चौकशीअंती, नाण्यांवर दावा करणारे प्रतिवादी (शिंदे बंधू) सुनावणीस उपस्थित न राहिल्याने, साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांचा दावा ग्राह्य धरण्यात आला. अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधित 9 नाणी सध्या ट्रस्टकडेच आहेत. याच आधारावर अरुण गायकवाड यांनी पुन्हा एकदा माध्यमांसमोर येत, “आमच्याकडील नाणीच खरी आहेत,” असा पुनरुच्चार केला.
दुसरीकडे, तक्रारदार संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे यांनी धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाला आक्षेप घेत त्याविरोधात कायदेशीर अपील दाखल करण्याची घोषणा केली आहे. त्यांचा दावा आहे की, “आम्ही लक्ष्मीबाई शिंदे यांचे थेट वंशज आहोत. त्यामुळे नाणी आमच्याकडेच आहेत. शैलेजा गायकवाड (लक्ष्मीबाईंची नात) आणि अरुण गायकवाड यांच्याकडे नाणी कशी येतील?” शिंदे कुटुंबाचा आरोप आहे की, त्यांना सुनावणीसाठी वेळेवर समन्स न मिळाल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. “सत्यता स्पष्ट व्हावी यासाठी पुरातत्व विभागाकडून सर्व नाण्यांची तपासणी व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
वर्ष 1918 साली विजयादशमीच्या दिवशी, साईबाबांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी सेवा करणाऱ्या लक्ष्मीबाई शिंदे यांना चांदीची 9 नाणी भेट दिली होती. हा प्रसंग साईचरित्रातही नमूद असून, ती नाणी आजही साईभक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक मानली जातात. या नाण्यांची मालकी आणि पारंपरिक हस्तांतरणाबाबत गायकवाड कुटुंबाचा दावा आहे की, लक्ष्मीबाई शिंदे यांच्या निधनानंतर (1963) ही नाणी त्यांची मुलगी सोनुबाईकडे गेली आणि पुढे त्यांची नात शैलेजा गायकवाड (माहेर शिंदे) यांच्याकडे आली. अरुण गायकवाड हे शैलेजा गायकवाड यांचे पुत्र असून, त्यांनीच या नाण्यांभोवती भाविकांसाठी ट्रस्ट स्थापन केला आहे.
2022 साली संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे यांनी साईबाबा संस्थान व पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती, ज्यात अरुण गायकवाड हे नाणी भाविकांना दाखवून मोठ्या प्रमाणावर देणग्या गोळा करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. साईबाबांनी दिलेली ही 9 चांदीची नाणी ही एक ऐतिहासिक, भक्तिपर आणि भावनिक ठेव मानली जाते. मात्र सध्या ती धार्मिकतेच्या पलीकडे जाऊन कायद्यात अडकलेली मालमत्ता बनत चालली आहे. यामुळे साईभक्तांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीसाईबाबांनी दिलेली ही ऐतिहासिक नाणी आणि त्यांची सत्यता जगासमोर येणे अत्यंत गरजेचे आहे.