हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला अत्यंत महत्त्व आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही नवरात्रोत्सव हर्षोल्लासात साजरा होत आहे. नऊ दिवसांच्या या पवित्र काळात देवी दुर्गेच्या नऊ स्वरूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. मनोकामना पूर्ण व्हाव्यात, घरात सुख-समृद्धी नांदावी यासाठी अनेक भाविक व्रत आणि उपवास पाळतात. काही भक्त सर्व नऊ दिवस उपवास करतात, तर काही पहिल्या दिवसापासून पंचमी, अष्टमी किंवा नवमीला उपवास करतात.
उपवासाचे संपूर्ण फल मिळवण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक मानले जाते. चला तर जाणून घेऊया नवरात्रीच्या उपवासात काय करावे आणि काय टाळावे.
🚫 नवरात्रीच्या उपवासात काय करू नये?
- राग, नकारात्मक विचार आणि इतरांविषयी वाईट बोलणे टाळा.
- पलंगावर झोपू नका; श्रद्धेने जमिनीवर झोपणे श्रेष्ठ मानले जाते.
- कांदा, लसूण, मासे, मांसाहार, मद्य, जंक फूड यांसारखे तामसिक पदार्थ खाऊ नका.
- उपवासादरम्यान नियमित मीठ वापरू नका; फक्त सैंधव मीठ वापरा.
- प्रवास करावा लागल्यास उपवास करू नका, कारण नियम पाळणे कठीण होऊ शकते.
- गंभीर शारीरिक समस्या असलेल्यांनी उपवास करू नये.
- घरी तामसिक पदार्थ बनवू नका; कुटुंबातील सदस्यांनीही हा नियम पाळावा.
- महिलांचा अनादर करू नका; आई, बहीण, पत्नी किंवा इतर कोणत्याही स्त्रीशी आदराने वागा.
- या काळात केस आणि नखं कापणं टाळा; परंपरेनुसार हे अशुभ मानले जाते.
✅ नवरात्रीच्या उपवासात काय करावे?
- नेहमी सत्य बोला, संयम पाळा आणि वादविवादापासून दूर रहा.
- मन शांत ठेवून देवीचे ध्यान करा.
- ब्रह्मचर्य, क्षमा, दया, उदारता आणि उत्साह यांचा अंगीकार करा.
- दररोज सकाळी-संध्याकाळी देवीची पूजा, दिवा आणि आरती करा.
- दुर्गा सप्तशतीचे पठण करा किंवा रोज देवीला तिच्या आवडीचे अन्न अर्पण करा.
- उपवास सोडताना नऊ कुमारिकांना जेवू घाला; अष्टमी व नवमीला त्यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.
नवरात्रीत शुद्ध आचरण, सात्त्विक अन्न आणि मन:शांती यांचा अवलंब केल्यास माता दुर्गा प्रसन्न होते, जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभते अशी श्रद्धा आहे.

