(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे-शीळ मार्गावर गुरुवारी सकाळी दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात शाळेत जाणारे ८ ते १० विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली. सकाळच्या शालेय वेळेत घडलेल्या या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, जखमींवर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एक एसटी बस भावे (दांडे) आडोम येथून रत्नागिरीच्या दिशेने येत होती, तर दुसरी बस रत्नागिरीहून दांडे आडोमच्या दिशेने जात होती. मिरजोळे येथील पाटीलवाडी पुढे शीळ गावाच्या मार्गावर दोन्ही बस समोरासमोर आल्या. रस्ता अरुंद असल्याने आणि एका बसचा वेग अधिक असल्याने चालकाला वाहनावरील नियंत्रण राखता आले नाही. परिणामी दोन्ही बसची जोरदार धडक होऊन अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघाताच्या वेळी बसमध्ये शाळेत जाणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करत होते. धडकेनंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केले.
या अपघातात ८ ते १० विद्यार्थी जखमी झाल्याचे समोर आले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी आणण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, समोरून येणाऱ्या एसटी बसचा वेग जास्त होता. अरुंद रस्त्यावर चालकाला वाहन नियंत्रित करता न आल्याने ही दुर्घटना घडल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, सकाळी सुमारे ७ वाजता अपघात होऊनही ९ वाजेपर्यंत एसटी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. अपघातानंतर प्रशासनाच्या प्रतिसादात झालेल्या विलंबाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.
अपघातस्थळी वरिष्ठ अधिकारी वेळेत पोहोचले नसले तरी, मात्र महामंडळाचे काही अधिकारी जिल्हा रुग्णालयात पोहोचले. जखमी विद्यार्थ्यांना पाचशे, हजार रुपये देऊन आर्थिक मदत देण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. मात्र या मदतीची अधिकृत घोषणा, निकष आणि रक्कम याबाबत महामंडळाकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. अपघाताची कारणमीमांसा आणि जबाबदारी निश्चित करण्यापेक्षा आर्थिक मदतीच्या माध्यमातून नाराजी कमी करण्याचा प्रयत्न झाला का, असा सवाल उपस्थित होत आहे.

