(संगमेश्वर)
तालुक्यातील माखजन-करजुवे मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्यामुळे या मार्गाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. मुसळधार पावसामुळे डोंगर भाग रस्त्यावर आला असून, रस्त्याच्या कडेने झाडे झुकली आहेत. परिणामी, प्रवाशांसह विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी धामापूर, वेसवीवाडी, धनावडेवाडी परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचताना चिखल, दरडी आणि अडथळ्यांतून वाट काढावी लागली. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे असून त्यात पाणी साचल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
याशिवाय रस्त्यालगत असलेल्या नाल्यांची सफाई व खोदाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. झाडांची मोठ्या प्रमाणावर वाकलेली फांदी रस्त्यावर पडण्याच्या स्थितीत असून, एखाद्या क्षणी मार्ग पूर्णपणे बंद होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांकडून अनेकदा तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही.
स्थानिकांचा इशारा; ‘सेना स्टाईल’ने विचारू जाब!
“आरवली ते करजुवे मार्गावरील नालेसफाई आणि खोदाईचे काम पूर्ण दुर्लक्षित झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांपासून ते वाहनचालकांपर्यंत सर्वांनाच धोका वाढला आहे. जर लवकरात लवकर दुरुस्ती केली नाही, तर आम्ही ‘सेना स्टाईल’ने बांधकाम विभागाला जाब विचारू.”
– बाबू मोरे, सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना शाखा प्रमुख, मावळंगे