(पुणे / सुरेश सप्रे)
महाराष्ट स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या जिल्हा प्रतिनिधींची सभा आज वरद श्री सभागृह शुक्रवार पेठ पुणे येथे पार पडली. या सभेस राज्यभरातून २३ जिल्ह्यातील एकशे दोन प्रतिनिधी उपस्थित होते.
या सभेत बँक मित्रांच्या समस्यावर उपस्थितांनी चर्चा केली. बँक मित्रांना अल्पशा कमिशन वर काम करावे लागते. त्यांना सेवेत सुरक्षितता नाही. रजा, मेडिकल, सुट्ट्या कुठल्याही सेवा, सवलती नाहीत. बँकेने मध्यस्थ कंपनीला दूर सारून प्रत्यक्ष बँक मित्रांशी कॉन्ट्रॅक्ट करावे आणि त्यांना मिळणाऱ्या कमिशनच्या दरात वाढ करावी इत्यादी मागण्या निश्चित करण्यात आल्या आणि १ मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनी याचे औचित्य साधून राज्यभरातून मागणी दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय संघटनेतर्फे सर्व लोकप्रतिनिधींना भेटून त्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.
या सभेला मार्गदर्शन करताना संघटनेचे अध्यक्ष देविदास तुळजापूरकर यांनी सरकारला असे आवाहन केले की बँकिंग, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्यात बँक मित्र महत्वाची भूमिका बजावतात हे लक्षात घेता सरकारने त्यांना स्थैर्य आणि सुरक्षितता मिळवून दिली पाहिजे, तरच जनधन योजना यशस्वी होईल. या सभेस ऐआयबीइए च्या जॉईंट सेक्रेटरी ललिता जोशी, स्टेट फेडरेशनचे पदाधिकारी सुमित नंबियार, शिरीष राणे, शैलेश टिळेकर उपस्थित होते. विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश सर्व भागातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.