(नवी दिल्ली)
केंद्र सरकारने आधार कार्डबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत 5 ते 7 आणि 15 ते 17 वयोगटातील मुलांना नवीन नोंदणी आणि बायोमेट्रिक अपडेटसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे जाहीर केले आहे. यापूर्वी या सेवांसाठी ₹50 शुल्क आकारले जात होते. UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) कडून ही माहिती देण्यात आली आहे.
बायोमेट्रिक अपडेट आता अनिवार्य
UIDAI ने लहान व किशोरवयीन मुलांचे बायोमेट्रिक अपडेट अनिवार्य केले आहे. विशेषतः मुलांच्या चेहऱ्यात व बोटांच्या ठशांमध्ये वयानुसार होणाऱ्या बदलांमुळे, अधिक अचूक ओळख सुनिश्चित करण्यासाठी हे अपडेट महत्त्वाचे ठरणार आहे.
कोणत्या वयोगटासाठी नियम लागू?
नवीन निर्णयानुसार, खालील दोन वयोगटांतील मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट किंवा नोंदणी आवश्यक व मोफत असेल:
- 5 ते 7 वयोगट
- 15 ते 17 वयोगट
या वयोगटातील मुलांना आधारमध्ये चेहरा, डोळ्यांचे ठसे (आयरिस स्कॅन) आणि बोटांचे ठसे (फिंगरप्रिंट्स) अपडेट करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
UIDAI कडून राज्यांना सूचना
UIDAI ने देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा, पालक आणि स्थानिक प्रशासन यांचीही मदत घेऊन हे अपडेट्स वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
बायोमेट्रिक अपडेट कसे करायचे?
- UIDAI च्या वेबसाइटवरून किंवा mAadhaar अॅपवरून जवळचे आधार नोंदणी केंद्र शोधा.
- केंद्रात जाऊन नोंदणी/अपडेट फॉर्म घ्या आणि आवश्यक माहिती भरा.
- केंद्रात फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रांसह बायोमेट्रिक तपशील (फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन) सबमिट करा.
- अपडेट पूर्ण झाल्यावर तुम्हाला स्लिप किंवा SMS द्वारे पुष्टी मिळेल.
पालकांसाठी महत्त्वाची सूचना
तुमच्या मुलाचे आधार अपडेट करणं अनिवार्य आहे. यासाठी आता कोणतेही शुल्क लागणार नाही, त्यामुळे वेळेवर अपडेट करून घ्या, असे आवाहन UIDAI ने पालकांना केले आहे.

