(रत्नागिरी)
केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘वेदर इन्फॉर्मेशन अँड नेटवर्क डेटा सिस्टीम’ (WINDS) या महत्त्वाकांक्षी योजनेत रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. हवामानदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात तब्बल ७८१ ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली जाणार आहेत. प्रशासनाच्या पुढाकारामुळे या कामाला गती मिळाली असून, हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
कामाचा टप्पा
सध्या ५५९ ग्रामपंचायतींनी केंद्रांसाठी जागा निश्चित केली असून, ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये प्रक्रिया सुरू आहे. ही केंद्रे उपग्रह व इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या आधारे माहिती संकलित करून थेट केंद्रीय सर्व्हरवर पाठवतील. त्यानंतर तज्ज्ञांच्या विश्लेषणातून हवामानविषयक सूचना एसएमएस, मोबाइल अॅप्स व स्थानिक यंत्रणेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत.
शेतकऱ्यांना होणारे फायदे
- गावपातळीवरील पाऊस, तापमान, आर्द्रता, वाऱ्याची अचूक नोंद.
- आपत्ती व नुकसानीची तपशीलवार आकडेवारी; पंचनामे व मदतवाटपाची गती वाढणार.
- पेरणी, फवारणी, सिंचन व खत व्यवस्थापनासाठी वेळेवर मार्गदर्शन.
- गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी यांची पूर्वसूचना मिळाल्याने पिकांचे संरक्षण शक्य.
- विमा दाव्यांमध्ये पारदर्शकता वाढून शेतकऱ्यांना न्याय मिळणार.
प्रशासनाचा दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोन
आतापर्यंत पावसाची नोंद महसूल मंडळ पातळीवरच होत होती, त्यामुळे गावागावातील प्रत्यक्ष परिस्थिती समजत नसे. आता प्रत्येक गावाजवळ अचूक नोंदी उपलब्ध होणार असल्याने “जलद मदत – बिनचूक हिशेब” या दिशेने रत्नागिरी जिल्हा देशात आदर्श ठरणार आहे.
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विश्वास वाढेल आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम व परिणामकारक होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

