(रत्नागिरी)
नेपाळमध्ये अलीकडे झालेल्या आंदोलनात तब्बल १३ हजार कैदी तुरुंगातून फरार झाल्याच्या खळबळजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलिस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नेपाळी कामगारांच्या काटेकोर चौकशीचे आदेश देत जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.
व्यावसायिकांना सूचना
रत्नागिरी जिल्ह्यात आंबा उद्योग, मच्छीमार नौका, हॉटेल व्यवसाय, चायनीज सेंटर व दगड-चिरे खाणींमध्ये मोठ्या प्रमाणावर नेपाळी कामगार कार्यरत आहेत. यावर लक्ष ठेवत पोलिसांनी स्पष्ट आदेश दिले आहेत :
- कोणत्याही नेपाळी कामगाराला कामावर घेण्यापूर्वी कागदपत्रांची सखोल पडताळणी बंधनकारक.
- कामगारांचा तपशील व फोटोसह माहिती रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात जमा करणे आवश्यक.
- सर्व नेपाळी कामगारांची ‘मैत्री अॅप’मध्ये अनिवार्य नोंदणी करणे आवश्यक.
- गावात नवा नेपाळी कामगार आढळल्यास तत्काळ त्याची चौकशी करून, संशयास्पद हालचाली पोलिसांना कळवणे अनिवार्य
यामध्ये झालेला हलगर्जीपणा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
गंभीर गुन्हेगारांचा धोका
फरार झालेले अनेक कैदी दहशतवाद, दरोडे, चोरी आणि गंभीर गुन्ह्यांत शिक्षा भोगत होते. त्यामुळे त्यांचा कोकणात शिरकाव झाल्यास कायदा-सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली उचललेली ही तातडीची व ठोस पावले कौतुकास्पद आहेत. रत्नागिरी सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांसोबत नागरिकांचा सहभाग व सतर्कता महत्त्वाची असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

