(रत्नागिरी / वैभव पवार)
मराठी भाषा दोन हजार वर्षापेक्षाही जुनी आहे. ती स्वायत्त असून तिच्यातील ग्रंथ संपदा ही देखील मोलाची असल्यानेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेत विविधांगी साहित्य उपलब्ध आहे. या साहित्य वाचनासोबतच विद्यार्थ्यांनी वृत्तपत्रातील अग्रलेख नियमित वाचावेत, असे आवाहन व्याख्याते माधव अंकलगे यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी अभिजात मराठी भाषा या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा कसा मिळाला, त्यासाठी कोणते निकष मराठी भाषेला पार करावे लागले, तसेच मराठी भाषा अभिजात भाषा झाल्यानंतर काय फायदे होऊ शकतात याबाबत माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी कोण-कोणत्या पुस्तकाचे वाचन करावे याबाबत विवेचन केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन श्री. माधव अंकलगे यांनी केले. हे ग्रंथप्रदर्शन १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सुरु राहील. कमलाबाई विसपुते इंग्लिश मिडीयम स्कूलचे विद्यार्थी कार्यक्रमला उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशांक नाईक यांनी केली. मुख्य लिपिक सुधाकर वाघ यांनी आभार प्रदर्शन यांनी केले. विजय आंब्रे यांनी कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य केले.

