(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील कळंझोडी फाटा दोन ते वाटद पूर्व बौद्धवाडीला जाणाऱ्या रस्त्याचे अंदाजे १४,६९,८७५ रुपये खर्चाचे काम उत्तर सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी कार्यालयाकडून रस्त्याचे टेंडर एका ठेकेदाराला देण्यात आले होते. मात्र, माहिती अधिकारातून धक्कादायक बाब समोर आली आहे. कामाची देयक विभागीय कार्यालयात प्राप्त झाली आहेत, परंतु अद्याप पारित करण्यात आलेली नाहीत आजपर्यंत ठेकेदाराला या कामासाठी एकही रुपया सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आलेला नाही असे समजते.
या रस्त्याचे दिनांक २६ मे २०२४ रोजी काम करत असताना समजल्यावर आरटीआय कार्यकर्ते निलेश रहाटे, संकेत ढवळे, यशवंत किंजले व गावातील काही नागरिकांनी रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी गावचे सरपंच श्री अमित वाडकर ही सोबत होते. सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून निष्कृष्ट दर्जाचे काम कशा प्रकारे करण्यात येत आहे हे सरपंचांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. रस्त्यावर टाकलेले डांबर हाताने बाहेर येत होते. या कामात कहर म्हणजे टेंडर देण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव वेगळे आहे व प्रत्यक्षात काम करणारा ठेकेदार हा दुसरा आहे. हे रस्ताचे काम टेंडर घेणाऱ्या ठेकेदाराने केलेले नसून प्रत्यक्षात दुसऱ्या ठेकेदाराने केल्याचे उघड झाले आहे. तसेच वरिष्ठ स्तरावरून आलेली कामे गावात सुरू असतानाही ग्रामपंचायत स्तरावर या कामांबाबत कोणालाच काही माहिती नसते हे मोठे नवल म्हणावे लागेल.
विशेष म्हणजे, माहिती अधिकाराद्वारे माहिती मिळविल्यानंतर रस्त्याजवळ संबंधित टेंडर आणि ठेकेदाराची माहिती दर्शवणारा फलक उभारण्यात आल्याचे नागरिक सांगतात. तसेच लाखो रुपयांचे काम करून आज वर्ष होत आले तरी आजवर ठेकेदाराला देयक दिलेले नसेल, तर ते फुकट का आणि कशासाठी करण्यात आले? हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. गाव खेड्यात दर्जाहीन कामे करून लाखो रुपये मिळविण्याचा हा व्यवसाय सध्या तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
संबंधित विभाग गप्प का?
या प्रकरणात काम झाले, पण पैसे दिले नाहीत की पैसेही गेले आणि कामही नीट झाले नाही? याबाबत सखोल चौकशीची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. हा रस्ता करून एक वर्ष पूर्ण होईल, मात्र अद्याप संबंधित यंत्रणांकडून स्पष्टता मिळत नाही. किंवा माहिती लपवण्याचा अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केला जात आहे का? कामात जर दोष असेल तर आजतागायत संबंधित विभाग गप्प का? असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.