(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरीत तब्बल पाच दशकांपूर्वी उभारण्यात येणाऱ्या अल्युमिनियम प्रकल्पासाठी घेतलेली शेतकऱ्यांची जमीन अद्याप वापरात न आणल्यामुळे शेतकरी संतापले आहेत. रत्नागिरी अल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेला याबाबत लेखी निवेदन देऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
संघाचे म्हणणे आहे की, ६ एप्रिल १९७५ रोजी नगर परिषद हद्दीतील सुमारे पाच एकर जागा महाराष्ट्र सरकारने BALCO कंपनीसाठी संपादित केली होती. मात्र आज ५० वर्षांनंतरही तो प्रकल्प वास्तवात आलेला नाही. परिणामी, ही जमीन ओसाड पडली असून शेतकऱ्यांचा उपजीविकेचा आधार हिरावला गेला आहे. प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांना फसवले गेले असून, एकीकडे शहराचा विकास होत असताना दुसरीकडे शेतकरी वंचित राहत आहेत, अशी खंत संघाने व्यक्त केली. एवढेच नव्हे तर, राज्य सरकार व संबंधित प्रशासनाने या जमिनीचे भावी नियोजन स्पष्ट केले नाही तर ती मूळ शेतकऱ्यांना परत मिळावी, अशी ठाम मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर संघाचे अध्यक्ष राजेंद्र आयरे, सचिव ॲड. अश्विनी आगाशे, उपाध्यक्ष अजय खेडेकर, तसेच कार्यकर्ते विलास सावंत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संघाने दिला आहे. मुख्याध्याधिकारी गारवे यांना निवेदन सादर करताना माजी नगराध्यक्ष मिलींद कीर, माजी नगरसेवक डाफळे आदी उपस्थित होते.

