(सातारा)
जिल्ह्यात एक विलक्षण आणि दुर्मिळ घटना घडली आहे. मूळची पुणे जिल्ह्यातील सासवड येथील रहिवासी काजल विकास खाकुर्डिया (वय २७) यांनी एकाच वेळी चार मुलांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, पाच वर्षांपूर्वी त्यांना तिळे झाले होते. त्यामुळे आता त्या एकूण सात मुलांची आई बनल्या आहेत. त्यांच्या कुटुंबात सध्या एकूण चार मुले आणि तीन मुली असा समावेश आहे.
काजल यांना आधी तीन अपत्ये आहेत, पाच वर्षांची जुळी मुले ओंकार आणि खुशी तसेच तीन वर्षांची मुलगी नेहा. दुसऱ्यांदा गरोदर असताना तपासणीदरम्यान तिळे होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र प्रसूतीसाठी साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांना गर्भात चार बाळं असल्याचे समजले. अखेर शस्त्रक्रियेद्वारे एका मुलगा आणि तीन मुलींचा सुखरूप जन्म झाला.
कठीण शस्त्रक्रिया, डॉक्टरांसाठी आव्हान
ही प्रसूती डॉक्टरांसाठी मोठे आव्हान होती. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सदाशिव देसाई आणि डॉ. तुषार मसराम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नीलम कदम, डॉ. दिपाली राठोड पाटील व अन्य वैद्यकीय पथकाने सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती यशस्वीरीत्या पूर्ण केली. सध्या आई आणि चारही बाळं ठणठणीत आहेत.
काजल यांचे पती विकास खाकुर्डिया हे गवंडी व मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिती कठीण असली तरी त्यांनी सर्व बाळं आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सात मुलांचा खर्च कसा भागवणार, असे विचारले असता त्यांनी मजुरी करूनच संसार चालवण्याचा निर्धार व्यक्त केला. शेजारी व नातेवाईकांनीही ही मुले “देवाचा प्रसाद” असल्याचे सांगत त्यांना मानसिक आधार दिला आहे.
अत्यंत दुर्मिळ घटना
या घटनेविषयी डॉ. सदाशिव देसाई म्हणाले, “साधारणतः ७० लाख ते ५ कोटी प्रसूतींमध्ये अशी घटना एखादी घडते. साताऱ्यातील ही घटना नक्कीच दुर्मिळ असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी पात्र ठरू शकते.”

