(मुंबई)
मूल्यांकन वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न (ITR) दाखल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर होती. मात्र, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) ती एक दिवसाने वाढवून आज १६ सप्टेंबर २०२५ पर्यंत केली आहे. या निर्णयामुळे लाखो करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय मध्यरात्री घेण्यात आला, आणि यामागचे कारण तांत्रिक अडचणी हेच ठरले.
तांत्रिक अडचणींनी उडवला खोळंबा
CBDT कडून दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभर ITR फाईलिंग प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी आल्या. आयकर विभागाची अधिकृत वेबसाइट वारंवार क्रॅश होत होती, तर काही वेळा अपडेटही होत नव्हते. त्यामुळे लाखो करदात्यांना रिटर्न फाईल करता आला नाही. अनेकांनी एक्स (Twitter) वर सरकारला टॅग करून तक्रारी नोंदवल्या.
सरकारला हलवले; करदात्यांच्या तक्रारी
शेवटच्या दिवशी तांत्रिक अडचणींमुळे निर्माण झालेला प्रचंड ताण पाहून सरकारने मध्यरात्रीच तातडीने बैठक घेऊन निर्णय घेतला. करदात्यांना कोणताही दंड न आकारता आणखी एक दिवसाची मुदत देण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे आता करदाते आजपर्यंत ITR दाखल करू शकतात.
आकडेवारी काय सांगते?
CBDT च्या आकडेवारीनुसार, १५ सप्टेंबरपर्यंत तब्बल ७.३० कोटींहून अधिक ITR दाखल झाले. गेल्या वर्षी हा आकडा ७.२८ कोटी होता, तर २०२३-२४ मध्ये ६.७७ कोटी करदात्यांनी रिटर्न दाखल केला होता. दरवर्षी फाईलिंगमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे या आकडेवारीतून दिसते.
करदात्यांना फायदा
ज्या करदात्यांना १५ सप्टेंबरपर्यंत रिटर्न फाईल करता आला नाही, त्यांना आता आज १६ सप्टेंबरपर्यंत कोणत्याही दंडाविना संधी मिळाली आहे. त्यामुळे उशीर न करता आजच रिटर्न फाईल करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आयकर विभागाने एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे. आयकर विवरण पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. त्यात बदल करत १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. अखेरच्या दिवशी लोकांना आयकर विवरण पत्र भरताना तांत्रिक अडचणी आल्या.
अनेकांकडून मुदत वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, आयकर विभागाने आता मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे सुरूवातीला स्पष्ट केले होते. मात्र, रात्री उशिरा एका दिवसाने मुदत वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

