(मुंबई)
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची सोमवारी मुंबई पोलिसांनी कसून चौकशी केली. त्याच्यावर तब्बल 60 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळ्याचा आरोप असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा (EOW) करत आहे.
10 सप्टेंबर रोजी राज कुंद्राला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले गेले होते. मात्र तो त्या दिवशी उपस्थित राहू शकला नव्हता. त्यानंतर आपल्या वकिलामार्फत 15 सप्टेंबरची मुदत मागून घेतली होती. त्यानुसार तो सोमवारी पोलीस आयुक्तालयात उपस्थित राहिला. जवळपास पाच तास त्याची चौकशी करण्यात आली आणि प्राथमिक जबाब नोंदवण्यात आला. या प्रकरणी राज कुंद्राला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही लवकरच ईओडब्ल्यूसमोर हजेरी लावावी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि आणखी एका व्यक्तीविरोधात ऑगस्ट 2025 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक दीपक कोठारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 2015 ते 2023 या कालावधीत झालेल्या आर्थिक व्यवहारात सुमारे 60 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. व्यावसायिक व्यवहारांच्या नावाखाली व्यवसाय विस्तारासाठी हे पैसे घेतल्याचे सांगितले जाते.
या घोटाळ्याचा तपास सुरू असून, पुढील चौकशीत शिल्पा शेट्टीचीही चौकशी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

