(चिपळूण / प्रतिनिधी)
तालुक्यातील गुढे (जोगळेवाडी) परिसरात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली. रवींद्र आग्रे (वय ६०, रा. गुढे जोगळेवाडी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
आंग्रे हे दुपारच्या सुमारास गावाजवळील रस्त्यावरून जात असताना अचानक वन्यप्राण्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी होऊन बराच वेळ रस्त्यावर पडून राहिले. दरम्यान त्या मार्गाने जाणाऱ्या काही ग्रामस्थांनी त्यांना पाहून तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
गावात वडापचा व्यवसाय करणारे तसेच काजू प्रक्रिया उद्योग चालवणारे आग्रे हे गावातील परिचित व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने गुढे गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, हल्ला नेमका गव्याने केला की बिबट्याने, याबाबत संभ्रम आहे. ग्रामस्थांच्या मते, सकाळी गुढे गावपरिसरात बिबट्या फिरताना दिसला होता. गावकऱ्यांनी त्याला हुसकावून लावले होते. त्यामुळे आग्रे यांच्यावर झालेला हल्ला गव्याचा नसून बिबट्याचा असू शकतो, असा ग्रामस्थांचा दावा आहे. काही दिवसांपूर्वीच शेजारच्या कळंबट गावातही बिबट्याने एका तरुणावर हल्ला केला होता. त्यामुळे या भागात भीतीचे सावट पसरले आहे. वनविभागाने या घटनेची दखल घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे. ग्रामीण भागात वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

