(राजापूर)
मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील पडवे स्टॉप येथे सोमवारी (२४ सप्टेंबर) सायंकाळी ४ वाजता मालवाहू ट्रक पलटी होऊन मोठा अपघात झाला. अपघातात ट्रक रस्त्याच्या खाली जाऊन उलटल्याने स्थानिक किराणा दुकान मालकाच्या मालाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने चालकाला फक्त किरकोळ दुखापत झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, महमंद शाहिद रफिक (वय २८, रा. कोदापुर, ता. शिमोगा, जि. वसानगर, कर्नाटक) हा आयसुलेट ट्रक (क्र. केए-२० एबी/४६७४) घेऊन चिरेखाण ते हातिवले असा प्रवास करत होता. पडवे स्टॉपजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्या खाली पलटी झाला.
या अपघातात पडवे तुकरुलवाडी येथील बाळकृष्ण सखाराम तांबे (वय ६८, व्यवसाय – किराणा दुकान) यांच्या मालाचे मोठे नुकसान झाले. घटनेनंतर त्यांनी राजापूर पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार, आरोपी चालकाविरोधात गुन्हा रजिस्टर क्र. ६४/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५, ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. राजापूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

