( रत्नागिरी /प्रतिनिधी )
दापोली तालुक्यातील कर्दै समुद्रकिनाऱ्यावर थार गाडी उलटल्याच्या अपघातानंतर जिल्हा पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेत तातडीने पाऊले उचलली आहेत. जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली असून, प्रवेशमार्गांवर बॅरिकेट्स, जांभा चिरे व लाकडी ओंडके टाकून बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता किनाऱ्यावर वाहन नेऊन बेफाम वेगात स्टंटबाजी करणाऱ्यांवर अंकुश बसणार आहे.
गेल्या काही काळात कोकण किनारपट्टीवर पर्यटकांकडून वाहनांतून स्टंटबाजी करण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे गाड्या वाळूत फसणे, भरतीच्या पाण्यात अडकणे, अपघात होऊन जीवितहानी होण्याचा धोका वाढला आहे. गतवर्षी दापोली तालुक्यातील मुरुड, हर्णे तसेच रत्नागिरीतील भाट्चे समुद्रकिनाऱ्यावर अशाच घटना घडल्या होत्या.
चार दिवसांपूर्वी कर्दै किनाऱ्यावर पुण्यातील पर्यटकांनी थार गाडी भरधाव चालवून स्टंट करण्याचा प्रयत्न केला. मात्र नियंत्रण सुटल्याने गाडी उलटून अपघात झाला. या प्रकाराची जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी गंभीर दखल घेतली व तत्काळ बंदी आदेश जारी केले. या कारवाईनंतर समुद्रकिनाऱ्यावर बेफाम वाहनचालकांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
उपाययोजना अपुऱ्या; जबाबदारीची ढकलाढकली
जिल्ह्यात सुमारे २०० किमी लांबीचा समुद्रकिनारा असून, बहुतांश किनारे ग्रामपंचायत व नगर परिषदेच्या हद्दीत आहेत. कर आकारणी होत असली तरी सुरक्षिततेच्या उपाययोजना मात्र दुर्लक्षित राहिल्या आहेत. पर्यटन विभागाच्या अखत्यारीत असतानाही ठोस कारवाई झालेली नाही. अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांकडून किनाऱ्यांवर कायमस्वरूपी गस्त घालणे शक्य नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्था व पर्यटन विभागाने जबाबदारी उचलणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
बॅरिकेट्स, ओंडके व चिऱ्यांनी रस्ते बंद
रत्नागिरी तालुक्यातील आरे, काजीरभाटी आणि गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यांवर जाणारे मार्ग लाकडी ओंडके टाकून बंद करण्यात आले आहेत. तर रत्नागिरी शहरातील भाट्ये किनाऱ्यावर जांभा चिरे रचून रस्ते रोखले आहेत. दापोलीतील मुरुड, कर्दे व लाडघर समुद्रकिनाऱ्यांकडे जाणारे मार्गदेखील बंद करण्यात आले असून, पर्यटकांना थेट वाहन घेऊन किनाऱ्यावर प्रवेश मिळणार नाही.
समुद्रकिनाऱ्यावर उपलब्ध साधनांचा वापर करून तातडीने बॅरिकेटिंग केले आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पर्यटन विभाग यांनी मिळून कायमस्वरूपी व मजबूत व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. पोलिस, पोलिस पाटील व ग्रामस्थ यांच्या मदतीने आम्ही तात्पुरती उपाययोजना करत आहोत. तसेच गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करत आहोत.
– आयपीएस नितीन बगाटे (जिल्हा पोलिस अधीक्षक )

