(नागपूर)
नागपुरातील अशोक चौकात एक विलक्षण आणि थक्क करणारे दृश्य पाहायला मिळत आहे. सध्या अंतिम टप्प्यात आलेल्या इंदोरा–दिघोरी उड्डाणपुलाच्या मार्गाचा बाह्यभाग थेट रस्त्यालगतच्या इमारतीच्या बाल्कनीतून गेला आहे.
सुमारे ९९८ कोटी रुपये खर्च करून इंदोरा ते दिघोरी हे टोक जोडणारा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. ग्रेट नाग रोडवरील अशोक चौकातून सक्करदऱ्याकडे जाणाऱ्या या पुलाच्या चौकात चार दिशांना मार्ग फुटत आहेत. यातील एका मार्गाचा बाह्यभाग इमारतीच्या वाढीव बांधकामाला धडकला आहे.
या विचित्र दृश्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, हा विषय नागपूरकरांच्या चर्चेचा ठरला आहे. नगरपालिकेच्या म्हणण्यानुसार, इमारत मालकाने अनधिकृत बांधकाम केले असल्यामुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे. वाढीव बांधकामासाठी महापालिकेकडून कोणतीही मंजुरी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे पुलाच्या आराखड्यात हे लक्षात आले नाही आणि आता काम अंतिम टप्प्यात पोहोचल्यावर हा अडथळा उघड झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित इमारत मालकाला अतिक्रमण काढण्याची नोटीस बजावली असून, महापालिकेलाही कारवाई करण्याचे पत्र देण्यात आले आहे. तरीसुद्धा आत्तापर्यंत अतिक्रमण कायम असून, घराच्या बाल्कनीतून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे दृश्य नागपूरमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्र्यांच्या शहरात असा प्रकार घडल्याने या चर्चेला अधिक ऊत आला आहे.

