[ विशेष/ प्रतिनिधी ]
मिऱ्या – नागपूर महामार्गवरील रत्नागिरी तालुक्यात रेल्वे स्टेशनपासून ते साळवी स्टॉपपर्यंतच नव्हे, तर संपूर्ण रत्नागिरीतील रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत होऊ लागला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले असून वाहनधारकांना अक्षरशः कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. गाड्या समुद्रातील होड्यांप्रमाणे उड्या मारत पुढे सरकतात. यातून नागरिकांना आरोग्य, वाहनांचे नुकसान आणि वेळेची हानी अशा तिन्ही बाबींना तोंड द्यावे लागत आहे.
एकीकडे ठेकेदार रवी इन्फ्रा कंपनीच्या सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. तर दुसरीकडे रस्त्यांवरील खड्ड्यांनी कहर केला आहे. या पट्ट्यातील काही ठिकाणी मार्गिका पूर्ण झाल्या असल्या तरी उर्वरित पट्ट्यातील रस्त्याची वाट अक्षरशः बिकट आहे. खड्ड्यांवरून गाड्या उड्या मारत पुढे सरकतात, रस्त्यांची दुरवस्था नित्याची झाली आहे. ठेकेदारांकडून केल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या कामावर महामार्ग प्राधिकरणासह जिल्हा प्रशासन कायम डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या ठेकेदार रवी इन्फ्रा कंपनीने गेल्यावर्षीप्रमाणे यंदाच्या पावसातही कहर केला आहे. मिऱ्या – नागपूर महामार्गासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असून तरी दर्जेदार रस्ता होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत प्राधिकरणाचे अधिकारी, जिल्हा प्रशासन गप्प का? ठेकेदाराचे संरक्षण कोण करत आहे? जबाबदारी कोणाची? असे सवाल उपस्थित करून वाहनचालकांकडून रस्त्यांवरून जाताना शिव्यांची लाखोली वाजली जात आहे.

या खड्डेमय रस्त्यावरून मोठी वाहने बेदरकारपणे हाकली जातात. त्यामुळे छोटे वाहनधारक आणि दुचाकीस्वार आणखी धोक्यात येतात. पाण्याने भरलेल्या खोल खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका टळत नाही. दरम्यान, वाहनांचे नुकसान तर होत आहेच; पण प्रवाशांमध्ये कंबरदुखी, पाठदुखी, डोकेदुखी अशा समस्या वाढू लागल्या आहेत.
सोशल मीडियावरून चिमटे
रस्त्यांची दुर्दशा पाहून नागरिकांनी सोशल मीडियावर प्रशासनावर हल्लाबोल सुरू केला आहे. या खड्ड्यांच्या रिल्स, पोस्ट्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. फेसबुक, इंस्टाग्रामवर रस्त्यांचे फोटो-व्हिडिओ शेअर करून नागरिकांनी अधिकाऱ्यांची खिल्ली उडवली आहे. ही खिल्ली म्हणजे जनतेच्या संतापाचे प्रतिक असल्याचे स्पष्ट होत आहे.
पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज
विकासकामे नागरिकांच्या सोयीसाठी असतात. परंतु, प्रशासनातील निष्काळजीपणा आणि ठेकेदारांच्या मनमानीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रवी इन्फ्रा कंपनीच्या व्यवस्थापकांचा फावते हे त्याचेच उदाहरण आहे. वेळेत देखरेख न करणे, तक्रारींवर योग्य प्रतिसाद न देणे आणि ठेकेदारांच्या चुका दाबून ठेवणे, हे नागरिकांचा विश्वास कमी करणारे आहे. करारातील अटी पाळल्या जात नाहीत, दर्जाहीन कामे केली जातात आणि तरीही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने ठेकेदार कंपनी बिनधास्त वागत आहे. सर्विस रोडची खराब स्थितीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या प्रकरणात पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर व ठेकेदार कंपनीवर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.

