( संगमेश्वर /प्रतिनिधी )
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याआधीच चिपळूण-संगमेश्वरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी रणशिंग फुंकले आहे. तालुक्यातील पंचायत समिती गणनिहाय मेळाव्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा ओतण्याचे आणि निवडणुकीसाठी सज्जतेचे बिगुल वाजवण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे.
याचाच भाग म्हणून हातीव (मोर्डे) पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा येत्या १४ सप्टेंबर रोजी वांझोळे (भोईवाडी) येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. श्री. बाळू शेडगे व श्री. भाऊ शेडगे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या मेळाव्यात आमदार शेखर निकम हे थेट मार्गदर्शन करणार असून, कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. निकम पॅटर्नमधून उभा राहिलेला विकास प्रत्येक गणात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घराघरात पोहोचवण्यावर भर या मेळाव्यामधून असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दृढ करण्यासाठी आणि चिपळूण-संगमेश्वर तालुक्यात यश संपादन करण्यासाठी हे मेळावे निर्णायक ठरणार असल्याचे पक्षातील जाणकारांचे मत आहे.
पहिल्याच मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली असून, या मेळाव्याला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. उत्साही वातावरणात होणाऱ्या या मेळाव्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापुढेही तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती गणात अशाच दमदार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असून, मुंबईसह कोकणातील वासीयांमध्येही अशा मेळाव्यांची मालिका उभारली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तालुक्यात रंगतदार वातावरण निर्माण केल्याचे चित्र दिसू लागले आहे.

