( रत्नागिरी )
मुंबई–गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांवरून जनआक्रोश समितीने थेट राज्याचे उद्योगमंत्री व रायगड–रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. उदय सामंत यांच्यावर घणाघात केला आहे. “फक्त २० टक्के काम शिल्लक आहे” असे वक्तव्य केल्यानंतर समितीने एक पोस्ट करत “खरंच तुम्ही कोकण पाहून आलात का?” असा थेट सवाल मंत्री सामंत यांना केला आहे.
काल आपण मुंबई–गोवा महामार्गाची रत्नागिरी ते चिपळूण ३५५ किमीची पाहणी केली आणि माध्यमांसमोर सांगितलं की “फक्त २०% काम बाकी आहे.” हे ऐकून आम्हाला क्षणभर वाटलं – आपण कोकणात नसून दुसऱ्याच एखाद्या राज्यात पाहणी करून आलात का? असा संतप्त सवाल जनआक्रोश समितीने केला आहे.
समितीच्या मते, खड्डे, अपूर्ण पूल, मातीचे उघडे तुकडे, रात्रभर ट्रॅफिक आणि अपघातांचा धोका यामुळे जनतेला महामार्गाचे ७०% काम अजूनही अपूर्णच वाटते. त्यामुळे ८० टक्के काम पूर्ण असल्याचा दावा हा जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारा आहे, असा हल्लाबोल समितीने केला आहे.
जनतेच्या जिवाशी खेळू नका — समितीचे आवाहन
जनआक्रोश समितीने म्हटले आहे की, “साहेब, तुम्ही ज्या जनतेच्या जीवावर मंत्री झालात, त्यांच्याच डोळ्यात धूळफेक कराल तर लोक कधी ना कधी जागे होतातच.” त्यांनी ना. सामंत यांना एक दिवस प्रत्यक्ष जनआक्रोश समितीच्या पाहणी दौऱ्यावर सहभागी होण्याचे खुले आवाहन केले आहे. “तुमचं म्हणणं आणि आमचं वास्तव – दोघांच्यातला फरक तुम्हालाच समजेल,” असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.
“चकचकता महामार्ग नको; पण जीव वाचेल असा रस्ता तरी द्या!”
ही टीका केवळ राजकीय हेतूने नाही, तर रोजच्या प्रवासात तडफडणाऱ्या जनतेचा आक्रोश आहे, असा सूर समितीने आवळला आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की, “कोकणाला चकचकता महामार्ग नको; पण किमान जीव वाचेल असा रस्ता तरी मिळावा, हीच अपेक्षा आहे.”
ना. उदय सामंत यांनी नुकतीच रत्नागिरी ते चिपळूण (३५५ किमी) दरम्यानच्या मुंबई–गोवा महामार्गाची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत “८० टक्के काम पूर्ण असून, केवळ २० टक्के काम बाकी” असल्याचा दावा केला होता. त्यांच्या याच विधानामुळे स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या या फेसबुक पोस्टवर जवळपास सर्वांनीच तिखट आणि संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जर या जनतेतून आंदोलनाची व्याप्ती वाढली, तर हे प्रकरण विधानसभेत गाजण्याची शक्यता आहे. सरकार आणि प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी आता कोकणातून जोर धरू लागली आहे.
आपल्या फेसबुक पोस्टमधून पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी म्हटले होते की…
मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी दौरा
आज रत्नागिरी जिल्ह्यातील बावनदी, वांद्री, संगमेश्वर या विविध ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. जेथे खड्डे आहेत, त्या ठिकाणी तातडीने खड्डे भरावेत अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पुढील शनिवारी पुन्हा या रस्त्याची पाहणी करून आढावा घेणार असल्याचे सांगितले.
काहीजण मुंबई-गोवा महामार्गाबाबत गैरसमज पसरवत आहेत. म्हणून मी स्वतः रत्नागिरीपासून चिपळूणपर्यंत संपूर्ण रस्त्याची पाहणी अधिकाऱ्यांसह केली आणि सत्य समोर आलं:
एकूण रस्ता – ३५५ किमी🔹त्यातील ३३४ किमी म्हणजेच ९३.१८% काम पूर्ण🔹आरवली ते कांटे प्रलंबित (फक्त २०% काम बाकी)🔹 उर्वरित २१.१९ किमी मध्ये साडेचार किमी डबल लेन काम पूर्ण व्हायचं आहे.
आज मुद्दाम खड्डे असलेल्या ठिकाणी थांबलो, पाहणी केली. जेव्हा ही साडेचार किमी डबल लेन पूर्ण होईल, तेव्हा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्णत्वास जाईल!