(पुणे)
पुण्यातील हिंजवडी IT पार्क हे भारतातील सर्वात मोठ्या आयटी पार्कांपैकी एक असून, येथे शेकडो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्यांचे कार्यालये आहेत. या पार्कमधून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली तरी वाढत्या ताणामुळे आणि पायाभूत सुविधांच्या मर्यादांमुळे अनेक कंपन्या महाराष्ट्राबाहेर स्थलांतराचा विचार करत आहेत.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने हिंजवडीवरील ताण कमी करण्यासाठी आणि स्थानिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी पुणे विमानतळाजवळील पुरंदर तालुक्यात नवे आयटी पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या प्रकल्पासाठी जमीन संपादन सुरू करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांच्या सूचनांनुसार उद्योग विभागाने महसूल विभागाला पत्र लिहून दिवे, चांबळी आणि कोडीत गावांमधील सरकारी मालकीची जमीन हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच हिंजवडीला भेट देऊन प्रशासनाला रस्ता रुंदीकरण आणि पायाभूत सुविधा सुधारण्याचे आदेश दिले. त्यांनी इशारा दिला की, आवश्यक सुधारणा न झाल्यास अनेक कंपन्या स्थलांतराचा गंभीर विचार करू शकतात.
एप्रिल 2025 मध्ये या प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात आला होता. आता पुन्हा एकदा या अंमलबजावणीस गती मिळाली असून, पुरंदर तालुक्यातील दिवे, चांबळी आणि कोडीत गावांमधील 1,500 एकर जागेवर हे आधुनिक IT पार्क उभारले जाणार आहे.
या पार्कमुळे हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील, तसेच पुरंदर परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळेल. याशिवाय, हिंजवडीवरील वाहतुकीचा ताण कमी होऊन पुण्याच्या आयटी उद्योगाला नवी दिशा मिळेल. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) करणार आहे. तज्ज्ञांच्या मते, आगामी काही वर्षांत पुरंदर हे पुण्याचे नवीन IT हब म्हणून उदयास येईल.

