(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रात आज (गुरुवारी, ११ सप्टेंबर) रोजी सायंकाळच्या सुमारास बुडणाऱ्या तीन तरुणांना वाचविण्यात स्थानिक जीवरक्षक आणि समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिकांना यश आले. ही घटना आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या स्वच्छतागृह इमारतीच्या समोरील समुद्राच्या चाळामध्ये घडून आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगर या ठिकाणाहून गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी व देवदर्शनासाठी पाच तरुण आले होते. त्या पाच तरुणांपैकी रामहरी राजपूत (वय 25), किशन वाघमारे (वय 30) व सुनील जाधव (वय 25) हे तिघेजण हे आंघोळीसाठी समुद्रात उतरले होते.
गणपतीपुळे येथील समुद्राची स्थिती अद्यापही धोकादायक आहे. तसेच समुद्राच्या लाटांचा जोर अद्याप ही कायम आहे. त्यामुळे मोठमोठ्या लाटा उसळी घेत असतानाच अचानक हे तरुण खोल पाण्यात ओढले गेले. त्यामुळे त्यांना बाहेर येणे मुश्किल झालेले असताना त्यांनी आरडाओरडा केला.
यावेळी किनाऱ्यावर असलेले गणपतीपुळे ग्रामपंचायतचे जीवरक्षक उमेश म्हादे, अनिकेत चव्हाण यांनी तात्काळ समुद्रकिनाऱ्यावरील स्थानिक व्यावसायिकांना माहिती देऊन समुद्राकडे धाव घेतली. यावेळी जीवरक्षक उमेश म्हादे व अनिकेत चव्हाण यांनी व्यावसायिक ओंकार शेलार, फोटोग्राफर रुपेश पाटील, गणपतीपुळे चे उपसरपंच संजय माने यांनी समुद्राच्या पाण्यात जाऊन या तिन्ही तरुणांना सुरक्षितरीत्या आपले साहित्य घेऊन बाहेर काढले.
यानंतर याविषयीची माहिती गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राला देण्यात आल्यानंतर पोलिसांनी या घटनेची पाहणी करून बुडणाऱ्या तरुणांना वाचविण्यात धाडसी कामगिरी केलेल्या जीव रक्षक व स्थानिक व्यवसायिकांचे कौतुक केले. या घटनेनंतर आलेल्या पर्यटकांनी गणपतीपुळे समुद्राच्या धोक्याची स्थिती लक्षात घेऊन खोल पाण्यात उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

