(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या शासन निर्णयाचा तीव्र विरोध करण्यासाठी रत्नागिरीत सोमवारी (ता. १५) ओबीसी-कुणबी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. भर पावसात काढलेल्या या मोर्चात शेकडो पुरुष, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई यांच्या नेतृत्वाखाली जयस्तंभ चौकातून सकाळी १० वाजता मोर्चाला सुरुवात झाली. घोषणाबाजीच्या गजरात तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यामुळे विद्यमान ओबीसींच्या हक्कांवर गदा येणार असल्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली.

या मोर्चाचे नेतृत्व रामभाऊ गराटे, विनायक शिवगण, गजानन धनावडे, ॲड सागर कळबंटे, विनया गावडे, साक्षी रावणांग यांनी केले. तर ओबीसी संघर्ष समितीचे राजीव कीर, दीपक राऊत, बसपाचे राजेंद्र आयरे यांच्यासह विविध नेते उपस्थित होते. ओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबलीच पाहिजे, ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे, आमच्या हक्कावर डाका चालणार नाही, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मुख्यमंत्र्यांसह शासनाला देण्यात आलेल्या निवेदनात, महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षणात घुसखोरी करू नये, अशी मागणी ठामपणे मांडण्यात आली. ‘एक दिवस समाजासाठी’ या भावनेने समाजाने एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी लढले पाहिजे, असा संदेशही या आंदोलनातून देण्यात आला.

