(रत्नागिरी)
महाभारतामध्ये पुरुषांपेक्षा स्त्री नायिका प्रभावशाली होत्या. द्रौपदी तर निखाऱ्यासारखी होती. द्रौपदीने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. तिच्या तेजाला वंदन. यातील स्त्रियांना मिळालेली नावे त्यांच्या वडील किंवा राज्यावरून दिली गेली. अनेकवेळा त्यांना मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागले. महाभारतात १०० कौरव पुत्र आणि अनेकांना झालेल्या पुत्रांचा उल्लेख आहे, पण मुलींच्या जन्माचा उल्लेख नाही. आजही समाजात मुलगी जन्माला आली तर नकोशी नाव ठेवले जाते. हा विचार केला पाहिजे आणि आधुनिक काळात मुलींनी आपले कर्तृत्व दाखवले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. सुचेता परांजपे यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ६९ व्या कालिदास स्मृति समारोह व्याख्यानमालेत ‘महाभारतातील निवडक स्त्री व्यक्तिरेखा’ या विषयावर त्या बोलत होत्या. सेमिनार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात रत्नागिरीकर श्रोते मंत्रमुग्ध झाले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये उपस्थित होत्या.
डॉ. परांजपे म्हणाल्या की, महाभारतात सत्यवती, गांधारी, कुंती, माद्री, द्रौपदी (पांचाली), अंबा, अंबिका, अंबालिका अशी अनेक महिला पात्रे आहेत. यातील प्रत्येकीचा विवाह हा तिला आवडलेल्या नायकाशी झाला नाही, हे एक साम्य आहे. गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधून चूक केली. परंतु द्रौपदीने पांडव हे कौरवांचे दास झाल्यानंतर त्यांना मुक्त करण्यासाठी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.
महाभारताच्या काळात राजघराण्याला वारस मिळत नसल्यास, पुत्रप्राप्ती होत नसेल स्त्रीला नियोग करण्याची परवानगी होती. त्याला धर्म, शास्त्राने मान्यता दिली होती. अशा महाभारतातील काही घटनांचा उल्लेख डॉ. परांजपे यांनी केला. गांधारी ही गांधार देशाची राजकन्या होती. तिला झाले शतपुत्र म्हणजे शंभर नव्हे तर भरपूर, खूप अशा अर्थाने संस्कृत अर्थ आहे. तिला खूप पुत्र झाले परंतु कुरुक्षेत्रावरील युद्धात ते सर्वच्या सर्व मारले गेले. तेव्हा तिला माता म्हणून काय वाटले असेल, असे डॉ. परांजपे यांनी स्त्रीची भावना मांडली. युद्धानंतर गांधारीचा शोक, तिची वाईट अवस्था, ज्यांचे ज्यांचे पुत्र, पती युद्धामध्ये मारले गेले अशा सर्व स्त्रियांचा शोक महाभारताच्या स्त्री पर्वामध्ये वर्णिलेला आहे.
कुरुक्षेत्रावर कौरव-पांडव युद्ध होण्याच्या पूर्वी तुम्ही आपापला पक्ष बदलू शकता असे जाहीर करण्यात आले. त्यावेळी युयुत्सु हा पुत्र पांडवांच्या बाजूने येतो. मद्र देशाची राजकन्या माद्री हिचे पांडू राजाबरोबर लग्न झाले. परंतु त्यासाठी भरपूर धन भीष्मांनी पाठविलेले होते म्हणून तिचा विकत घेतलेली असा उल्लेख महाभारतात आहे. महाभारतात अनेक स्त्री पात्रांच्या विवाहाच्या बाबतीत एक प्रकारे फसवणूकच झाली, असे डॉ. परांजपे यांनी सांगितले. महाभारतातील या स्त्रिया अन्याय होऊनही सतत आपले कर्तव्य करीत राहिल्या आणि म्हणूनच महाभारत घडले, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. कल्पना आठल्ये यांनी प्रमुख वक्त्या आणि सर्व सहकार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना धन्यवाद दिले. शांतिमंत्र गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
विद्यार्थ्यांचा गौरव
भा. का. नेने स्मृती पारितोषिक व श्रीमती कमला फडके स्मृती पारितोषिक- मधुश्री वझे, वेदश्री बापट, मनस्वी नाटेकर, अमृता आपटे. सौ. ललिता घाटे पारितोषिक व प्रा. पूर्णिमा आपटे स्मृती पारितेषिक- मनस्वी नाटेकर, पं. दा. गो. जोशी स्मृती पारितोषिक- कल्पजा जोगळेकर. प्रश्नमंजूषा- प्रथम- पूर्वा खाडिलकर, वेदश्री बापट, पौर्णिमा ढोकरे, द्वितीय- ओंकार खांडेकर, साक्षी शेवडे, मधुश्री वझे, तृतीय- कनक भिडे, हिमानी फाटक, तेजस्विनी जोशी. अंत्याक्षरी स्पर्धा- प्रथम- मीरा काळे, साक्षी शेवडे, स्मितल बेंडे, द्वितीय- ओंकार खांडेकर, वेदश्री बापट, पूर्वश्री जावडेकर, तृतीय- कल्पजा जोगळेकर, दीप्ती गद्रे, पौर्णिमा ढोकरे, उत्तेजनार्थ- मनस्वी नाटेकर, पूर्वा खाडिलकर, चिन्मयी टिकेकर.

