(नाशिक)
मनमाड नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे वॉर्ड क्रमांक १० मधील उमेदवार नितीन वाघमारे यांचे सोमवारी मध्यरात्री हार्ट अटॅकमुळे निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने शहरासह राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मनमाडच्या गायकवाड चौक परिसरातील रहिवासी असलेले वाघमारे हे काही दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून सक्रिय झाले होते. जाहीरनाम्यानंतर त्यांनी निवडणुकीसाठी जोरदार प्रचार मोहीम राबविली होती. मात्र, काळाने घात केला आणि मतदानाच्या फक्त काही दिवस आधीच त्यांचे निधन झाले.
वॉर्ड क्रमांक १० मधील उमेदवाराच्या अकस्मात मृत्यूमुळे त्या प्रभागातील निवडणूक पुढे ढकलली जाणार का? याबाबत स्थानिक पातळीवर चर्चांना ऊत आला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय काय असेल याची उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, मनमाड नगरपरिषदेसाठी या वेळी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी ९ उमेदवार रिंगणात आहेत, तर नगरसेवकांच्या ३३ जागांसाठी तब्बल २१५ उमेदवार स्पर्धेत आहेत. शिवसेना (शिंदे गट), भाजप, आरपीआय एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) स्वबळावर मैदानात आहेत. काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, बसप आणि अपक्षांसह अनेक उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत.

