(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील हिंदू कॉलनी परिसरात मुलांमधील किरकोळ वादाचे पडसाद पालकांपर्यंत पोहोचून गंभीर हाणामारीत रूपांतर झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या झटापटीत एक दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून, रत्नागिरी शहर पोलिसांनी दुसऱ्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हनिफ मेमन आणि खुशबू मेमन (दोघे रा. हिंदू कॉलनी, माशाअल्ला अपार्टमेंट, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. याप्रकरणी सना खालीद मजगावकर (वय ३३, रा. हिंदू कॉलनी, माशाअल्ला अपार्टमेंट) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादीनुसार, बुधवारी सायंकाळी सना मजगावकर या आपल्या नोकरीवर असताना त्यांच्या मुलाने फोन करून अपार्टमेंटमधील मेमन कुटुंबासोबत वाद झाल्याचे कळवले. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरी आल्यानंतर ‘माझ्या मुलाला का मारले?’ असा जाब सना यांनी खुशबू मेमन यांना विचारला. त्यावरून दोघींमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर सना आपल्या फ्लॅटमध्ये गेल्या.
मात्र, या जाब विचारण्याच्या रागातून रात्री आठच्या सुमारास खुशबू मेमन आणि त्यांचे पती हनिफ मेमन हे सना मजगावकर यांच्या फ्लॅटमध्ये घुसल्याचा आरोप आहे. यावेळी हनिफ मेमन यांनी लोखंडी रॉडने सना यांचे पती खालीद मजगावकर यांच्या डोक्यावर वार केला. पतीला वाचविण्याच्या प्रयत्नात सना मध्ये पडताच खुशबू मेमन यांनी त्यांच्या तोंडावर मारहाण करत नखांनी चेहरा ओरबाडल्याचे तक्रारीत नमूद आहे. पुढे झटापटीदरम्यान हनिफ मेमन यांनी सना यांच्या डोक्यावरही रॉडने वार केल्याचे सांगण्यात आले. या गोंधळात सना यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तुटून हरवल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या मजगावकर दाम्पत्याला बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर दोन्ही कुटुंबीयांचे नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने रुग्णालयात जमल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र, शहर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून जमावाला पांगविल्याने संभाव्य अनर्थ टळला. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

