(मुंबई)
मतदारयादीतील घोळ आणि मतचोरीविरोधात आज (१ नोव्हेंबर) मुंबईत ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ अनेक वर्षांनंतर प्रथमच एका व्यासपीठावर एकत्र आले. महाविकास आघाडीसह मनसेच्या वतीने फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालय असा भव्य ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला.
या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तिन्ही नेते एका मंचावर उभे राहिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिला गेला.
मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू असतानाच काँग्रेसमध्ये मात्र थोडा गोंधळ दिसून आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले असले, तरी मुंबई काँग्रेसकडून अधिकृत संदेश न गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर शेवटच्या क्षणी काँग्रेसने मोर्चात एन्ट्री घेतली आणि नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, भाई जगताप आदींनी “व्होट चोर, गद्दी चोर!”च्या घोषणा देत मोर्चात सहभाग नोंदवला.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “मतदारयादीतील गोंधळाचा मुद्दा देशात सर्वप्रथम राहुल गांधींनी उचलून धरला. महाराष्ट्रातही हा घोळ मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या परिस्थितीत जनतेचा विरोध स्वाभाविक आहे.”
विजय वडेट्टीवार यांनी सांगितले, “मताची चोरी कुणी व कशी करत आहे हे उघड करण्याचे काम राहुल गांधींनी केले. पारदर्शक निवडणुका होण्यासाठी काँग्रेस सदैव पुढे राहील.”
भाई जगताप यांनी म्हटलं, “ज्या बोगस यादीच्या आधारे विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वापरल्या जात आहेत. या अन्यायाविरोधातच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.”
राज ठाकरे यांची ठाम भूमिका
राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर तीव्र टीका करत, “जोपर्यंत मतदारयादीतील घोळ आणि बोगस नावे दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका!” अशी ठाम मागणी केली. “एका घरात शेकडो मतदार दाखवले गेले आहेत; दुबार आणि बोगस नावे काढून टाकल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत,” असा इशारा त्यांनी दिला.
महाविकास आघाडी व मनसेची संयुक्त हाक
या मोर्चाद्वारे निवडणूक आयोगावर दबाव आणण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मनसे-शिवसेनेमधील वाढती जवळीक लक्षवेधी ठरली, तर काँग्रेसने अखेर सहभागी होत मोर्चाला बळ दिले. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एका व्यासपीठावर एकत्र आल्याने ‘सत्याचा मोर्चा’ हा केवळ विरोधाचा नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांमध्ये बदल घडवणारा ठरला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

