(कणकवली)
आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना कणकवली तालुक्यातील वारगाव (सोरफ-सुतारवाडी) येथे घडली आहे. दारूच्या नशेत पोटच्या मुलानेच आपल्या ८० वर्षीय आईचा निर्घृण खून केल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
ही घटना बुधवारी रात्री सुमारे ११.३० वाजता घडली. आरोपी रवींद्र रामचंद्र सोरफ (४५) याचा दारूच्या व्यसनामुळे आई प्रभावती रामचंद्र सोरफ यांच्यासोबत वाद झाला. या वादातून संतापलेल्या रवींद्रने जवळ असलेल्या धारदार कोयत्याने आईच्या डोक्यासह शरीरावर वारंवार प्राणघातक वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या आईला पाहूनही तो थांबला नाही, उलट तिला ओढत घराच्या हॉलमध्ये आणले.
अवघ्या काही क्षणांत घडलेल्या या प्रकारामुळे सोरफ कुटुंब तसेच गाव हादरून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व आरोपी रवींद्रला अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कसून चौकशी सुरू आहे.

