(प्रकाश चाळके / देवळे)
सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगा, फेसाळणारा धबधबा आणि सप्तलिंगी नदीच्या निसर्गरम्य परिसरामुळे आकर्षण ठरणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील पूर गावातील ओझर धबधब्याला पर्यटनाच्या नकाशावर स्वतंत्र ओळख मिळवून देण्यासाठी क्रांती व्यापारी संघटना, देवरूख यांनी पुढाकार घेतला आहे. ‘देवनगरी देवरूख पर्यटन प्रकल्पा’अंतर्गत ओझर धबधबा आणि सप्तलिंगी नदी परिसराच्या विकासासाठी ७ कोटी ८० लाख रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला असून, हा प्रस्ताव आमदार शेखर निकम यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. ग्लास स्कायवॉक, रिव्हर व्ह्यू गार्डन, म्युझिकल फाउंटन, आकर्षक रोषणाई आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांचा या प्रस्तावात समावेश आहे.
आमदार शेखर निकम यांनी यापूर्वी ओझर धबधबा परिसराला भेट देऊन तेथील निसर्गसौंदर्याची पाहणी केली होती. या ठिकाणाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्यांनी ओझरचा उल्लेख ‘देवरूखचे मिनी नायगारा’ असा केला होता. तसेच येथे ग्लास ब्रिजसह पर्यटन सुविधा विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर या परिसराच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने क्रांती व्यापारी संघटनेने पुढाकार घेत विकासाचा प्राथमिक आराखडा तयार केला आहे.
या प्रस्तावातील प्रमुख आकर्षण म्हणजे धबधबा आणि सप्तलिंगी नदीचे विहंगम दृश्य अनुभवता यावे यासाठी उभारण्यात येणारा ‘सिग्नेचर ग्लास स्कायवॉक’. केवळ नदीवर पूल उभारण्यापुरती संकल्पना मर्यादित न ठेवता, उंचावरून धबधबा आणि नदीचे सुरक्षित दर्शन घेता येईल, अशी या सुविधेची कल्पना आहे. कँटिलिव्हर किंवा यू-आकाराचा ग्लास स्कायवॉक, काचेचे व्ह्यूइंग पॅनेल्स आणि परिसराचे ३६० अंशांतून दर्शन घडविणारा व्ह्यूइंग डेक उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, स्कायवॉकची प्रत्यक्ष रचना, लांबी आणि खर्च तांत्रिक सर्वेक्षण, भू-अभियांत्रिकी तपासणी आणि संरचनात्मक आराखड्यानंतर निश्चित होणार आहे. या कामासाठी प्राथमिक अंदाजानुसार २ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पर्यटनस्थळाचे आकर्षण वाढविण्यासाठी ‘रिव्हर व्ह्यू गार्डन अँड लँडस्केप डेव्हलपमेंट’ची संकल्पनाही मांडण्यात आली आहे. कोकणातील नैसर्गिक सौंदर्याशी सुसंगत आणि पर्यावरणपूरक उद्यान विकसित करण्याचा यामागील उद्देश आहे. या उद्यानात नदी व धबधब्याचे विहंगम दर्शन घडविणारे पॅनोरॅमिक व्ह्यू डेक, निसर्गरम्य पायवाटा, छायाचित्रांसाठी विशेष ठिकाणे, सावलीतील बैठक व्यवस्था, विश्रांती क्षेत्र आणि स्थानिक वनस्पतींचे संवर्धन यांचा समावेश असेल. ‘Ozar – Mini Niagara Point’, ‘Saptalingi River View’ आणि ‘Devanagari Devrukh’ या नावांनी आकर्षक फोटो पॉइंट्स विकसित करण्याचेही नियोजन आहे. या उद्यान आणि लँडस्केप विकासासाठी १ कोटी रुपयांचा प्राथमिक खर्च प्रस्तावित आहे.
धबधबा परिसरातील पर्यटनाचा अनुभव अधिक आकर्षक करण्यासाठी म्युझिकल फाउंटन आणि नियंत्रित विद्युत रोषणाई विकसित करण्याची योजना आहे. याशिवाय महिला, पुरुष आणि दिव्यांगांसाठी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वाहनतळ, अंतर्गत रस्ते, पर्यटन माहिती केंद्र, सीसीटीव्ही यंत्रणा, प्राथमिक उपचार सुविधा, कचरा व्यवस्थापन आणि सौरऊर्जेच्या पर्यायांचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. या सुविधांमुळे ओझर धबधबा परिसराचा नियोजनबद्ध पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचा प्रयत्न आहे.
क्रांती व्यापारी संघटनेने तयार केलेल्या प्राथमिक खर्च आराखड्यानुसार ग्लास स्कायवॉकसाठी २ कोटी ५० लाख रुपये, रिव्हर व्ह्यू गार्डन व लँडस्केप विकासासाठी १ कोटी रुपये, व्ह्यू पॉइंट, वॉकिंग ट्रॅक व सुरक्षा कठड्यांसाठी ४५ लाख रुपये, आकर्षक विद्युत रोषणाईसाठी ५५ लाख रुपये आणि म्युझिकल फाउंटन व लाईट शोसाठी ६५ लाख रुपये प्रस्तावित आहेत.
तसेच स्वच्छतागृहांसाठी २५ लाख रुपये, पिण्याचे पाणी व जलव्यवस्थेसाठी १२ लाख रुपये, वाहनतळ व अंतर्गत रस्त्यांसाठी ४० लाख रुपये, पर्यटन माहिती केंद्रासाठी २० लाख रुपये, सुरक्षा, सीसीटीव्ही व प्राथमिक उपचार सुविधांसाठी २५ लाख रुपये, कचरा व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धनासाठी १६ लाख रुपये, प्रवेशद्वार, दिशादर्शक फलक व सुशोभीकरणासाठी २२ लाख रुपये आणि विद्युत पायाभूत सुविधा व सौरव्यवस्थेसाठी २० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR), सर्वेक्षण, तांत्रिक सल्ला आणि आकस्मिक तरतुदीसाठी ६५ लाख रुपये राखण्याचे प्रस्तावित आहे. या सर्व कामांचा एकत्रित प्राथमिक अंदाजित खर्च ७ कोटी ८० लाख रुपये आहे.
हा खर्च केवळ प्राथमिक स्वरूपाचा असून, प्रत्यक्ष जागेचे सर्वेक्षण, तांत्रिक तपासणी, आवश्यक परवानग्या आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर अंतिम खर्च निश्चित केला जाणार आहे.
प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी क्रांती व्यापारी संघटनेने आमदार शेखर निकम यांच्याकडे विशेष मागणी केली आहे. तज्ज्ञ अभियंत्यांमार्फत ओझर धबधबा परिसराची पाहणी करून संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे प्रस्ताव सादर करावा, तसेच सिंधुरत्न समृद्धी योजना 2.0 अंतर्गत आवश्यक निधी मंजूर करून प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.
या पर्यटन विकासामुळे स्थानिक युवक, महिला बचत गट, शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. स्थानिक खाद्यपदार्थ, कोकणी उत्पादनांची विक्री, पर्यटकांसाठी मार्गदर्शक सेवा आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसायांना चालना मिळू शकते. देवरूख, संगमेश्वर आणि परिसरातील अन्य पर्यटनस्थळांना जोडून व्यापक पर्यटन साखळी विकसित करण्याची संधीही या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते. मात्र, पर्यटन विकास करताना सप्तलिंगी नदीचे नैसर्गिक पात्र, परिसरातील जैवविविधता आणि पर्यावरणाचे संरक्षण यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे प्रस्तावित संकल्पनेत अधोरेखित करण्यात आले आहे.
क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल सुनील कोळवणकर, उपाध्यक्ष इस्तियाक युनूस कापडी, सचिव नंदकिशोर मनोहर बेर्डे, कार्याध्यक्ष नितीन श्रीधर हेगशेट्ये, खजिनदार उदय यशवंत जागुष्टे आणि सहसचिव संदीप भार्गव वेल्हाळ यांच्यासह कार्यकारी मंडळातील पदाधिकारी, सदस्य आणि सर्व सभासदांच्या वतीने हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
ओझर धबधबा आणि सप्तलिंगी नदी परिसराचा नियोजित आराखड्यानुसार विकास झाल्यास देवरूखच्या पर्यटनाला नवी दिशा मिळू शकते. मात्र, ७ कोटी ८० लाख रुपयांच्या या प्राथमिक प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता आणि निधी कधी मिळणार, तसेच प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होणार, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


