(राजापूर / रत्नागिरी)
गेल्या दोन वर्षांपासून दम्याच्या आजाराने त्रस्त असलेल्या रमाकांत शांताराम सरदेसाई (वय ६५, रा. ताम्हाणे, जांभुळवाडी, ता. राजापूर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी (१५ ऑक्टोबर) पहाटे रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सरदेसाई यांना घरी असताना दम्याचा त्रास सुरू झाला. त्रास वाढल्याने खबर देणारे प्रदीप रमाकांत सरदेसाई यांनी त्यांना १५ ऑक्टोबर रोजी पहाटे २.३० वाजता उपचारासाठी रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता पहाटे सुमारे ४.०५ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
या घटनेची राजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.


