(मुंबई)
दीड-दोन कोटींचे कमिशन घेत त्या बदल्यात सायबर भामट्यांना १५० बँक खात्यांची माहिती पुरविणाऱ्या ११ जणांच्या टोळीला डोंगरी पोलिसांनी अटक केली आहे. कंबोडिया आणि नेपाळ या ठिकाणी जाऊन टोळीतील तिघांनी मुख्य अभियंता आरोपीची भेट घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी जुलै महिन्यात डोंगरीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला सायबर भामट्यांनी फसव्या शेअर ट्रेडिंग अॅपद्वारे साडेआठ लाखांना गंडवले. याच गुन्ह्यांच्या तपासाअंती आरोपी हाती लागले. तपास पथकाने पाच लॅपटॉप, १६ मोबाइल आणि दोन महागड्या गाड्या जप्त केल्या आहे. आरोपी नाशिक, पुणे, जळगाव आणि कराड या शहरांतील रहिवासी आहेत. त्यातील सहाजण गेले अनेक दिवस गोव्यात होते. त्यांना ३१ जानेवारीला अटक करण्यात आली.
यापैकी आकाश दुसाने ऊर्फ आकाश सोनार, दिनेश तायडे, मोहम्मद पटेल यांनी नेपाळ आणि कंबोडिया देशांत जाऊन मुख्य अभियंता आरोपींची भेट घेतली. याच भेटीत त्यांनी आवश्यक असलेली बँक खाती आणि त्यातून ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी सीम कार्ड पुरवण्याबाबत चर्चा केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार मुख्य सूत्रधारांचाही शोध सुरू आहे.
आरोपींनी फसवणुकीची रक्कम प्राप्त करण्यासाठी भारत देशातील विविध बँकेचे चालू खाते वेगवेगळ्या लोकांकडून विकत घेत एक ठराविक रक्कम देऊन त्या बँक खात्यांचा वापर टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून करत होते.
येथील नागरिक टार्गेटवर….
मुख्य आरोपींच्या भेटीनंतर सोनार, तायडे आणि पटेल या तिघांनी नाशिक, पुणे, जळगाव, कराड येथील ओळखीतल्या व्यक्तींना संपर्क साधून त्यांच्या नावे उघडण्यात आलेली १५० बँक खाती परदेशातील प्रमुख आरोपींना पुरवली. या खात्यावरील प्रत्येक २ व्यवहाराच्या बदल्यात या त्रिकुटाला कमिशन मिळायचे. त्यातील काही रक्कम हे तिघे ज्यांच्या नावे बँक खाती आहेत त्यांना देत होते. या तिघांना प्रत्येकी दीड ते 3 दोन कोटी रुपयांचे कमिशन मिळाल्याचे समोर येत आहे. कमिशनच्या पैशांतून आरोपींनी महागड्या गाड्या, मालमत्ता विकत घेतल्या.