( नवी दिल्ली )
कथित दिल्ली अबकारी धोरण प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत भावनिक पण ठाम भूमिका मांडली. केंद्र सरकारवर थेट राजकीय हल्ला चढवत त्यांनी आगामी निवडणुकांची मागणी केली. “दिल्लीमध्ये आता निवडणुका घ्या आणि काय होते ते पाहा. भाजपाने 10 पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडेन,” असा थेट इशाराही त्यांनी दिला.
दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्ट ने या प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व 23 आरोपींना दोषमुक्त केल्याचा निकाल दिला. या निकालानंतर केजरीवालांनी न्यायालयाचे आभार मानत पत्रकार परिषदेला सुरुवात केली.
“प्रामाणिकपणाचा सर्वात मोठा विजय”
केजरीवाल म्हणाले, “भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. दबावाला न जुमानता सत्याच्या बाजूने उभे राहिलेल्या न्यायाधीशांचे मी विशेष आभार मानतो.” न्यायालयाने हे प्रकरण गृहितकांवर आणि खोट्या साक्षींवर आधारित असल्याचे स्पष्ट केल्याचा दावाही त्यांनी केला.
“मी पैसा नाही, प्रामाणिकपणा कमावला”
आपला राजकीय प्रवास सचोटीवर उभा असल्याचे सांगत केजरीवाल म्हणाले, “मी माझ्या आयुष्यात पैसा कमावला नाही. आज न्यायालयाने सिद्ध केले आहे की मी, मनीष सिसोदिया आणि संजय सिंह कट्टर इमानदार आहोत. आम आदमी पार्टी एक प्रामाणिक पक्ष आहे.”
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मौन का बाळगले, या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले, “मी फक्त राजकारणी नाही. माझ्या कुटुंबाला लक्ष्य केल्याचा परिणाम होतो. संपूर्ण देशासमोर निर्दोष सिद्ध झाल्यावरच बोलायचे ठरवले होते. आज मनावरचे मोठे ओझे उतरले आहे.”
न्यायालयाने कोणताही गुन्हेगारी कट किंवा मनी ट्रेल सिद्ध न झाल्याची नोंद घेतल्याचा संदर्भ देत केजरीवालांनी या प्रकरणामागे पक्ष कमकुवत करण्याचा राजकीय हेतू असल्याचा आरोप केला. “दोन वर्षे हजारो पानांची आरोपपत्रे दाखल झाली, पण शेवटी काहीही निष्पन्न झाले नाही. आम्हाला तुरुंगात टाकले गेले, पण पक्ष फुटला नाही,” असे ते म्हणाले.
राजकीय तुलना करताना त्यांनी प्रश्न उपस्थित केले. “मी तुरुंगात गेलो, पण रॉबर्ट वड्रा कधी गेले का? मनीष सिसोदिया गेले, पण राहुल गांधी गेले का? संजय सिंह गेले, पण सोनिया गांधी गेल्या का?” विरोधी पक्षांनी यावर आत्मपरीक्षण करावे, असेही ते म्हणाले. तुरुंगातील काळ आणि कुटुंबावर झालेल्या परिणामांची आठवण सांगताना केजरीवाल भावूक झाले. कठीण काळात खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल त्यांनी पत्नी सुनीता केजरीवाल तसेच पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानले.
पुढील राजकीय अजेंडा
या निकालानंतर आपची पुढील रणनीती स्पष्ट करत त्यांनी 1 मार्च रोजी जंतरमंतर येथे “रोजगार दो, सामाजिक न्याय दो” रॅलीची घोषणा केली. दिल्लीतील बस मार्शल, मोहल्ला क्लिनिक कर्मचारी आणि डेटा एंट्री ऑपरेटर यांना नोकरीतून काढल्याचा आरोप करत त्यांनी भाजपावर टीका केली.
या पत्रकार परिषदेतून निकालानंतर गप्प न बसता अधिक जोमाने मैदानात उतरण्याचे संकेत केजरीवालांनी दिले आहेत. दिल्लीच्या राजकारणात येत्या काळात संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

