(बारामती)
राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी बारामतीत जाहीर केले. पवार यांनी राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक मदत पुरवली नसल्याची खंत व्यक्त केली.
बारामतीत गोविंद बाग येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, “प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी संघटनेच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी अस्वस्थ असून, दिवाळी साजरी करण्याच्या मनस्थितीत नाहीत.”
पवारांनी राज्य सरकारवर टीका करत म्हणाले, “शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळाली नाही. राजकारण न करता, शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. दिलेली मदत अपुरी असून, नुकसान भरून काढणे शक्य नाही.”
मतदार यादीसंदर्भात महाविकास आघाडीतील पक्षांच्या तक्रारींबाबतही पवार म्हणाले, “निवडणूक आयोगासमोर सर्व बाबी मांडल्या आहेत, पुढे काय होईल याकडे लक्ष आहे.”

