(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. रत्नागिरीहून आलेल्या एका अज्ञात महिलेनं थेट देशमुख कुटुंबीयांच्या घरासमोर धाव घेतली आणि आपल्या कडे कृष्णा आंधळेबाबत ठोस पुरावे असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली.
शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही महिला देशमुखांच्या घरासमोरील मंडपात दाखल झाली. तिच्या सांगण्यानुसार, कृष्णा आंधळे तिच्यासोबत राहतो आणि तिच्याकडे त्याचे अनेक पुरावे आहेत. मात्र, पोलिस आल्यावर तिनं आपलं नाव सांगण्यास नकार दिला. रात्रभर मंडपात थांबलेल्या महिलेने दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुखांच्या घरातील बाथरूममध्येच अंघोळ करण्याचा हट्ट धरला. इतर बाथरूमची व्यवस्था करूनही ती तयार झाली नाही, यामुळे घरातील सदस्यांत संशय आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.
या संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्यानंतर महिला अखेर बसने रत्नागिरीकडे रवाना झाली. पोलिसांकडून सदर महिलेची चौकशी सुरू असून, ती रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. दरम्यान, कृष्णा आंधळे गेल्या महिन्यात नाशिकमध्ये दिसल्याचा दावा एका व्यक्तीनं केला होता. आता रत्नागिरीतील या महिलेच्या दाव्यामुळे पोलिस तपासाला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे.
धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया:
“महिलेबाबत कुटुंबीयांनी माहिती दिल्यानंतर आम्ही गावकरी आणि पोलिसांना कळवलं. रत्नागिरी पोलिसांनी देखील त्या महिलेने अशाच स्वरुपाच्या तक्रारी तिकडे नोंदवल्याची माहिती दिली. ती आमच्या घरीच अंघोळ करण्याचा आग्रह करत होती, त्यामुळे थोडा संशय आला. सध्या पोलिस तपास करत असून, ती महिला निघून गेली आहे,” अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.