(गुहागर / सचिन कुळये)
रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवातील पाककला स्पर्धेत गुहागर तालुक्यातील नरवण गावच्या संयुक्ता विशाल मोरे यांनी तयार केलेल्या ‘वाफवलेल्या थ्री लेयर पिझ्झा’ने प्रथम क्रमांक पटकावला. या अनोख्या पदार्थामध्ये पौष्टिक तृणधान्यांसह विविध रानभाज्यांचा कल्पकतेने वापर करण्यात आला होता.
संयुक्ता मोरे या नरवण ग्रामपंचायतीच्या सदस्या असून विविध पाककला आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्या उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. यावेळी त्यांनी पारंपरिक रानभाज्यांना आधुनिक पाककृतीची जोड देत वाफवलेला थ्री लेयर पिझ्झा तयार केला.
या पिझ्झासाठी तांदळाचे पीठ, नाचणीचे पीठ यांसह भारंगीची भाजी, टाकळ्याची भाजी, फोडशीची भाजी, टोमॅटो, लिंबू, काकडी आणि विविध चवदार मसाल्यांचा वापर करण्यात आला. पौष्टिक तृणधान्ये आणि रानभाज्यांचा संगम साधत तयार करण्यात आलेल्या या अभिनव पाककृतीला परीक्षकांची विशेष पसंती मिळाली आणि संयुक्ता मोरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
रानभाज्या आणि पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या महोत्सवाला पर्यावरणप्रेमी, शेतकरी, महिला आणि खाद्यप्रेमींची मोठी गर्दी झाली होती. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या रानभाज्यांचा आहारात समावेश करून त्यापासून विविध पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ तयार करता येतात, याचे उदाहरण संयुक्ता मोरे यांच्या पाककृतीतून पाहायला मिळाले.
स्पर्धेतील विजेत्यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमदार डॉ. उदय सामंत, आमदार किरण सामंत तसेच रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती महेश नाटेकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. संयुक्ता मोरे यांच्या या यशाबद्दल नरवण परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

