( रत्नागिरी /प्रतिनिधी )
जिल्हा हादरवून सोडणाऱ्या तिहेरी खून प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. मुख्य आरोपी दुर्वास पाटीलसह त्याचे तीन साथीदार पोलीस कोठडीत असतानाच, पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेले दुर्वासचे वडील आणि सायली बारचे चालक दर्शन पाटील यांचाही या रक्तरंजित मालिकेत सहभाग आहे का? याबाबत आता पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.
सायली बार सील केल्यानंतर पोलिसांना मयत भक्ती मयेकरचा मोबाईल मिळाला असून, त्यावरून धक्कादायक पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, आधीच्या दोन खूनप्रकरणातही दर्शन पाटीलची छाया असल्याचे संशय अधिक बळावले आहे. त्यामुळे हा गुन्हेगारीचा सापळा केवळ दुर्वासपुरता मर्यादित नसून, त्याच्या घरापर्यंत पोहोचत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
भक्ती मयेकरवर प्रेमसंबंधातून लग्नाचा तगादा, तिचे गरोदरपण आणि त्यातून जन्माला आलेली भीती यामुळे दुर्वासने 16 ऑगस्ट रोजी तिचा गळा आवळून खून केला. मात्र त्याआधी सायली बारमध्ये काम करणाऱ्या सिताराम वीरची मारहाणीनंतर झालेला मृत्यू आणि या घटनेचा साक्षीदार ठरलेल्या राकेश जंगमचा खून या सगळ्याच धाग्यांनी पोलिसांना आता नव्या निष्कर्षापर्यंत नेले आहे. पोलिसांनी आता मुख्य आरोपी दुर्वास पाटील यांच्या वडील दर्शन पाटील यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनी देखील या प्रकरणात नव्या वळणाचा उल्लेख करत, हे फक्त एक खून नाही, तर कटकारस्थानाची मालिका आहे. दुर्वाससोबत त्याच्या वडिलांचीही भूमिका तपासली पाहिजे अशी मागणी केली होती. त्याचबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाने अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांच्या पथकाने तपास गतीमान केला असून, लवकरच आणखी मोठे धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

