(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडण्याच्या दृष्टीने निवळी ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळांना पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून लॅपटॉप, कलर प्रिंटर, टॅब, स्मार्ट टीव्ही तसेच सोलर लाईटचे वाटप सरपंचांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे निवळीतील शाळांमध्ये तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला चालना मिळणार आहे.
या वेळी बोलताना सरपंच सौ. तन्वी प्रशांत कोकजे यांनी ग्रामपंचायत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. ग्रामीण भागातील मुला-मुलींना केवळ शैक्षणिकदृष्ट्याच नव्हे, तर शारीरिक व मानसिकदृष्ट्याही सक्षम करण्यासाठी लवकरच कराटे व टायक्वांडो यांसारख्या आत्मसंरक्षण प्रशिक्षणांची सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
तसेच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी संगीत व तबला प्रशिक्षण सुरू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास उपसरपंच संजय निवळकर, ग्रामपंचायत सदस्य दिपाली देवरुखकर, गावचे पोलीस पाटील भालचंद्र शीतक, आरोग्य विभागातील सौ. खंडाळकर, आशा सेविका सोनाली शिंदे व सुविधा रावणंग यांच्यासह सर्व शाळांचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

