(वर्धा)
वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) परिसरात सुरू असलेला मेफेड्रोन (MD) ड्रग्जचा भयंकर कारखाना महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) ‘ऑपरेशन Hinterland Brew’ अंतर्गत उद्ध्वस्त केला. या कारवाईत तब्बल 128 किलो मेफेड्रोन जप्त झाले असून त्याची बाजारातील किंमत तब्बल ₹192 कोटी इतकी आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडे उत्पादनासाठी वापरलेली तात्पुरती भट्टी, भांडी, रसायने आणि उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
DRI ला विशिष्ट गुप्त माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी वर्ध्यापासून सुमारे ७५ किमी अंतरावर असलेल्या कारंजा (घाडगे) येथील दुर्गम, निर्जन जंगल परिसरात पाळत ठेवली. स्थानिक रहिवाशांच्या शंका टाळण्यासाठी हा कारखाना जंगलाच्या आत खोल भागात उभारण्यात आला होता.
पाळतीनंतर खात्री पटताच अधिकाऱ्यांनी छापा टाकला आणि 128 किलो तयार मेफेड्रोन, 245 किलो कच्चा माल तसेच उत्पादनासाठी लागणारी उपकरणे जप्त केली. ही कारवाई विदर्भातील आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्ज रेड मानली जात आहे.
अटक आरोपींपैकी एक हा मुख्य फायनान्सर आणि केमिस्ट असून तोच संपूर्ण उत्पादन प्रक्रियेचा प्रमुख मास्टरमाइंड असल्याचे DRI च्या तपासात स्पष्ट झाले. त्याच्यासह दोन साथीदारांना अटक झाली असून तिघेही मेफेड्रोन उत्पादन आणि वितरण नेटवर्कमध्ये सक्रिय होते. त्यांच्यावर NDPS Act 1985 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
‘ऑपरेशन Hinterland Brew’ अंतर्गत DRI ने या वर्षी आतापर्यंत पाच ड्रग्ज कारखाने उद्ध्वस्त केले आहेत. वर्ध्यातील ही कारवाई त्यातील सर्वात मोठी मानली जात आहे.

