( खेड )
मुंबई-गोवा महामार्गावरील खेडजवळील भोस्ते घाटात आज (बुधवारी, २४ जून) रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास भरधाव कंटेनरचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली असून कंटेनर चालक जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूणहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या (क्रमांक DD03R9973) कंटेनरवरील चालकाचे घाटात उतरताना नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर प्रथम महामार्गावरील दुभाजक ओलांडून विरुद्ध मार्गिकेत गेला. त्यानंतर पुन्हा मुंबईच्या मार्गिकेत येत रस्त्यावरच पलटी झाला.
पलटी झाल्यानंतर कंटेनर काही अंतर रस्त्यावर घासत गेला आणि अखेर महामार्गालगतच्या लोखंडी संरक्षक कठड्याला धडकून दरीच्या अगदी टोकावर जाऊन थांबला. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
अपघाताची माहिती मिळताच खेड येथील ‘मदत ग्रुप’चे अध्यक्ष प्रसाद गांधी आणि अभिषेक डेरवणकर यांनी रुग्णवाहिकेसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी चालकाला कंटेनरमधून सुरक्षित बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली.
या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. अपघातग्रस्त कंटेनर हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

