(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील अवैध मटका जुगार व्यवसायावर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष सूचना दिल्यानंतर या शाखेकडून आणखी एक यशस्वी कारवाई पार पडली.
दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना त्यांना मारुती मंदिर परिसरात मटका जुगाराचे व्यवहार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमकडे जाणाऱ्या पायऱ्यांकडे पाहणी करताना एक इसम काहीतरी लिहिण्यात गुंग असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. संशय आल्याने पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली असता तो इसम मुंबई मटका जुगाराचे आकडे व घेतलेली रक्कम पावती बुकात नोंदवत असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत त्याने आपले नाव मेघशाम चंद्रकांत नाचणकर (वय ५१, रा. मच्छिमार्केटसमोर, बाजारपेठ, रत्नागिरी) असे सांगितले.
त्याला तत्काळ ताब्यात घेत पावती बुक, जुगाराशी संबंधित साहित्य व ₹1,550/- रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 453/2025 अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडली. या कारवाईत खालील स.पो.फौ. सुभाष भागणे, पो.हवा बाळू पालकर, पो.हवा विक्रम पाटील, पो.हवा अमित कदम, पो.हवा सत्यजीत दरेकर यांनी सहभाग नोंदविला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार व्यवसायावर धाक निर्माण झाला असला तरी इतर ठिकाणी राजरोज सुरू असणाऱ्या अड्ड्यांवर अशी धाड टाकली जाणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

