(रत्नागिरी)
लांजा तालुक्यातील वाकेड घाट परिसरात काल (शनिवारी) रात्री मुसळधार पावसामुळे भीषण दुर्घटना घडली. वाकेड बौद्धवाडीजवळ राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या पेट्रोल पंपाच्या बांधकामस्थळी अचानक दरड कोसळल्याने सुमारे 55 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाकेड घाट परिसरात पेट्रोल पंपाच्या उभारणीचे काम सुरू असून, कामगारांसाठी घटनास्थळी तात्पुरता निवारा उभारण्यात आला होता. शनिवारी रात्री सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एक वृद्ध व्यक्ती पावसापासून बचाव करण्यासाठी या निवाराजवळ थांबली होती. त्याचवेळी डोंगराचा काही भाग अचानक खचून मोठी दरड कोसळली आणि ती व्यक्ती ढिगाऱ्याखाली गाडली गेली.
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बगळे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी यंत्रणा आणि आपत्कालीन बचाव पथकाच्या मदतीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री उशिरा ढिगाऱ्याखालून सुमारे 55 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
या दुर्घटनेत घटनास्थळी काम करणारे जेद अतिकुल त्यागी (18), सुवेल अयुब त्यागी (19) आणि महंमद समीन साहवेज (22) हे तिन्ही कामगार सुदैवाने सुरक्षित बचावले. त्यामुळे आणखी मोठी जीवितहानी टळली.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रियंका ढोले यांनीही घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी समन्वयाने मदतकार्य राबविले.
सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याने प्रशासनाने नागरिकांना घाट परिसरात अनावश्यक थांबणे टाळण्याचे आणि अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

