( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने थिबा राजा यांची १६७ वी जयंती मंगळवार, दि. १ जानेवारी २०२६ रोजी रत्नागिरीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी १० वाजता शिवाजीनगर येथील थिबा राजा यांच्या स्मृतिस्थळी दीपप्रज्वलन व पुष्पार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर डी.एस.पी. बंगल्या शेजारी असलेल्या थिबा राजा कालीन बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध यांच्या बुद्धरूपास पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थित बंधुभगिनींनी त्रिसरण पंचशीलाचे सामूहिक पठण केले.
यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन (सिव्हिल हॉस्पिटल शेजारी) येथे आयोजित अभिवादन सभेत थिबा राजा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल जाधव यांनी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात संघर्ष समितीचे एल. व्ही. पवार यांनी थिबा राजा यांच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करत, थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समिती हा वारसा समर्थपणे पुढे नेत असल्याचे स्पष्ट केले. बुद्ध विहाराची जागा समाजाच्या ताब्यात घेऊन तेथे समाजाच्या वतीने भव्य आणि दिव्य बुद्ध विहार उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाने संघर्ष समितीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास, येत्या काळात केवळ रत्नागिरी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मजबूत संघटन उभे करून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या जयंती कार्यक्रमासाठी रत्नागिरी तालुक्यातील विविध भागांतील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. थिबा राजा यांच्या स्मृतीस अभिवादन करताना संपूर्ण वातावरणात श्रद्धा, एकोपा आणि सामाजिक जाणीवेची भावना निर्माण झाली होती.

