(जैतापूर / राजन लाड)
31 ऑगस्ट 2025 रोजी रत्नागिरी बस डेपोमधून नाटे गावाकडे जाणाऱ्या एस.टी. बसमधील प्रवाशांना धक्कादायक अनुभव आला. प्रवासादरम्यान बस चालक वारंवार मोबाईल फोनवर बोलत गाडी चालवत असल्याचे त्यांचे निदर्शनास आले.
विशेष म्हणजे, अपघात-प्रवण रस्ते – घाटातील तीव्र उतार तसेच आडीवरे येथील धोकादायक करविंग परिसरातही चालक एका हातात फोन धरून दुसऱ्या हाताने बस चालवत होता. त्या वेळी बसमध्ये लहान मुले, वयोवृद्ध महिला यांच्यासह अनेक प्रवासी उपस्थित होते. प्रवाशांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण करणारी ही बेफिकीर कृती गंभीर अपघातास कारणीभूत ठरू शकली असती.
एका प्रवाशाने सांगितले, “मी स्वतः बसमध्ये बसलो असताना हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला असून त्याचा व्हिडिओ माझ्याकडे पुराव्यासाठी उपलब्ध आहे. संबंधित चालकाविरुद्ध तातडीने कारवाई झाली पाहिजे, अन्यथा अशा वर्तनाने या पुढेही कधीही मोठा अपघात होऊ शकतो.”
प्रवाशाने जिल्हा परिवहन विभागाकडे औपचारिक तक्रार दाखल केली असून, त्यासोबत शूट केलेल्या व्हिडिओची लिंक आणि बसचे तिकीट (PDF स्वरूपात) जोडले आहे. परिवहन महामंडळाच्या वेबसाईटवर 1 MB पेक्षा मोठी फाईल अपलोड करण्यास मर्यादा असल्याने तो पुरावा थेट लिंकद्वारे पाठवण्यात आला आहे.
प्रवाशांची स्पष्ट मागणी आहे की, संबंधित चालकाची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी. अन्यथा यापुढेही प्रवाशांचा जीव धोक्यात आणि भविष्यात अपघात झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी परिवहन प्रशासनावर राहील.

