(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
पुण्यात पार पडलेल्या २० व्या महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळाव्यात रत्नागिरी पोलीस दलाने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. राज्य राखीव पोलीस बल गट–२, पुणे येथे १५ ते १९ सप्टेंबरदरम्यान झालेल्या या मेळाव्यात “पोलीस फोटोग्राफी” या स्पर्धेत पोलिस हवालदार (१२६५) अमोल अरुण गमरे (नेमणूक : जिल्हा विशेष शाखा, रत्नागिरी) यांनी कांस्य पदक आणि प्रमाणपत्र मिळवले.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध विभागांतून एकूण ४४ पोलिस अंमलदारांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये कोकण परिक्षेत्राचे प्रतिनिधित्व करत गमरे यांनी कौशल्यपूर्ण छायाचित्रण सादर केले आणि विजेतेपद पटकावले. गमरे यांच्या या यशाबद्दल विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र संजय दराडे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच सोमवारी (दि. २२ सप्टेंबर) पोलीस अधीक्षक रत्नागिरी नितीन बगाटे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी (मुख्यालय) राधिका फडके तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनीही गमरे यांचे कौतुक केले. रत्नागिरी पोलीस दलातील या कामगिरीमुळे जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर झळकले असून, सहकाऱ्यांकडूनही गमरे यांचे अभिनंदन होत आहे.

