(नवी दिल्ली)
राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटाने देश हादरला आहे. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर दिल्लीतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेनंतर तातडीने तपास कार्याला वेग देण्यात आला असून, केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवला आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक बोलावून घटनेचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, दिल्ली पोलिस आयुक्त तसेच जम्मू-काश्मीरचे डीजीपी व्हर्च्युअली सहभागी झाले होते. बैठकीनंतर अमित शाह म्हणाले, “सर्व शक्य बाजूंनी चौकशी केली जात आहे. हल्ल्यासाठी वापरलेली हुंदाई i20 कार आणि संशयितांचे दहशतवादी संबंध याची सखोल चौकशी सुरू आहे. दिल्लीसह देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.”
प्रत्यक्षदर्शींच्या मते, स्फोट इतका भीषण होता की, परिसरातील अनेक वाहने क्षणात जळून खाक झाली. काही समजायच्या अगोदरच परिसरात आगीचा भडका उडाला आणि जखमी मदतीसाठी आरडाओरडा करू लागले.
फरिदाबाद मॉड्यूलशी संबंध?
तपासात या स्फोटाचा ‘फरिदाबाद मॉड्यूल’शी थेट संबंध असल्याचे उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वी काश्मीर पोलिसांनी फरिदाबादहून डॉ. मुझम्मिल शकील आणि लखनौहून डॉ. शाहिना शाहिद या दोघांना अटक केली होती. या दोघांचे संबंध जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी असल्याचे समोर आले आहे.
‘डॉक्टर दहशतवादी नेटवर्क’ उघडकीस
या प्रकरणात तब्बल सहा डॉक्टरांचा सहभाग असल्याचा तपासात संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये डॉ. आदिल अहमद राठर आणि डॉ. मोहम्मद उमर ही नवी नावे समोर आली आहेत. डॉ. उमर हा स्फोट झालेल्या कारमध्ये होता, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. तर डॉ. आदिलला सहारनपूर येथून अटक करण्यात आली असून, त्याच्या लॉकरमधून एक एके-४७ रायफल जप्त करण्यात आली आहे.
मुंब्रा येथे एटीएसची छापेमारी
दरम्यान, महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने मुंबईतील मुंब्रा परिसरात छापेमारी करून दोन संशयितांची चौकशी सुरू केली आहे. त्यांच्याकडून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली असून, त्यांचा तांत्रिक विश्लेषणासाठी तपास सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
“षड्यंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही” — पंतप्रधान मोदी
भूतान दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील स्फोटानंतर प्रतिक्रिया दिली आहे. “दिल्लीतील या घटनेने देश हळहळला आहे. मी पीडित कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल. तपास यंत्रणा या कटाच्या मुळाशी जाईल, आणि षड्यंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही,” असे मोदी म्हणाले.
स्फोट आत्मघाती हल्ला असण्याची शक्यता
दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा आत्मघाती हल्ला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फरिदाबाद मॉड्यूलमधील अटकेनंतर संशयितांनी आत्मघाती स्फोटाची योजना आखल्याचे संकेत मिळाले आहेत. सध्या एनआयए, दिल्ली पोलिस, आयबी आणि एटीएस अशा अनेक तपास यंत्रणा संयुक्तरीत्या चौकशी करत आहेत.

