(मुंबई / प्रतिनिधी)
मुंबईमधील लोअर परळ डिलाईल रोड येथील नाथस्वामी बेकरी मठात गुरुपौर्णिमा महोत्सव अपूर्व उत्साहात तितक्याच भक्तीभावाने साजरा करण्यात आला. संपूर्ण दिवसभर मठामध्ये भाविकांची दर्शन आणि आशीर्वादासाठी गर्दी उसळली होती.
मठाचे प्रमुख गुरुवर्य श्री.नाथस्वामी यांनी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांची विधिवत पूजा केल्यानंतर गुरुपौर्णिमा महोत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. गुरुपौर्णिमेनिमित्त संपूर्ण मठ टवटवीत सुगंधित फुलांनी सुशोभित करण्यात आला होता. मठामध्ये भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांची उभी आणि बैठी सुंदर मूर्ती असून या दोन्ही मूर्ती सजविण्यात आल्या होत्या.
सद्गुरु पाद्यपूजन सोहळा उत्साहात…
दुपारनंतर गुरुवर्य श्री.नाथस्वामी यांचा पाद्यपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. हजारो भाविकांनी पाद्यपूजन करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सद्गुरु श्री.नाथस्वामी गेल्या दोन तपाहून अधिक काळ दीन,दुःखीत, पीडित लोकांना मार्गदर्शनाच्या माध्यमातून स्वामी कार्य विनामूल्य करीत आहेत. भांबावलेल्या भाविकांना धीर, दिलासा आणि धैर्य देण्याचे कार्य या मठाच्या माध्यमातून होते. त्यामुळे मठामध्ये दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पाद्यपूजनानंतर सायंकाळी आरती आणि त्यानंतर श्री नाथस्वामी यांचा सत्संग पार पडला. गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
विठ्ठल- रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा…
आषाढी एकादशीच्या शुभ पर्वावर मठामध्ये विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा श्रद्धापूर्वक वातावरणात करण्यात आली. आषाढी एकादशीलाही दर्शनासाठी भाविकांनी मठामध्ये गर्दी केली होती. मठामध्ये श्री दत्तात्रय महाराज यांचीही स्थापना झाली आहे.